भीम आर्मी, गाडगेनगर ठाणेदारात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:48 PM2018-10-14T21:48:03+5:302018-10-14T21:48:34+5:30
निवेदन देण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्यासाठी थांबलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. रविवारी नियोजन भवनात आढावा बैठक सुरू असताना प्रवेशद्वाराबाहेर हा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवेदन देण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्यासाठी थांबलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. रविवारी नियोजन भवनात आढावा बैठक सुरू असताना प्रवेशद्वाराबाहेर हा प्रकार घडला.
या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी भीम आर्मी भारत एकता मिशनचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले होते. सरळ सेवा भरतीतील १५४ पोलीस उपनिरीक्षकांना मॅट कोर्टाच्या निर्णयावरून त्वरित सेवेत रुजू करून घ्यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते नियोजन भवनाबाहेर उभे होते. दरम्यान गाडगेनगर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला. यावेळी गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरेसह अन्य पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ सुरू असताना भीम आर्मीचे सुदाम बोरकर व ठाणेदार ठाकरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. अखेर पोलिसांनी भीम आर्मीच्या पाच जणांना ताब्यात घेऊन गाडगेनगर ठाण्यात नेले. त्यानंतर कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १८६, १३५ बिपी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात ठाणेदारांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
ठाणेदारांवर भेदभावाचा आरोप
१५४ पीएसआयना सेवेत रुजू करण्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो, संविधानात्मक पध्दतीने सीएम यांना निवेदन देणार होतो. मात्र, ठाणेदार मनीष ठाकरे आले. आम्हाला पाहताच हे लोक कसे काय उभे आहे, यांना टाका रे गाडीत, असे म्हटले आणि त्यांनी माझा हात पकडून लोटलाट केले. तुम्ही खाद्यांवर दुप्पटा टाकलेत, तर नेते झाले काय, असे म्हटले. हीच लोकशाही आहे का, या अन्यायाबद्दल आम्ही सीपींना निवेदन देऊ, वेळ पडल्यास कोर्टात न्याय मागू, न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ, अशी प्रतिक्रिया भीम आर्मी जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.