भिवंडी, मुंबई, अकोल्याचा प्रयोग अचलपूर, अमरावतीत - सुरेश खोपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 12:19 PM2022-04-20T12:19:19+5:302022-04-20T12:27:51+5:30
अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले.
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : पोलिसांची पद्धत फायर ब्रिगेडसारखी आहे. आग लागू नये, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. फिक्स पॉइंट, वायरलेस यंत्रणा, गाड्यांचा ताफा, लाठीमार अटक, चार्जशीट दाखल, पुन्हा दंगलीची प्रतीक्षा हे सर्व बदलण्यासाठी झालेला भिवंडी प्रयोग अचलपूर, अमरावती शहरातही कसा राबविता येईल, यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. येत्या काही दिवसांत ते अचलपूर येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीला येणार आहेत.
अमरावतीनंतर अचलपुरात जातीय तेढ पुन्हा होऊ नये, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचा भिवंडी प्रयोग, मोहल्ला कमिटी या माध्यमातून राबविण्यासंदर्भात सांगितले. हिंदू-मुस्लीम दंगली हा देशातील फार जुना प्रश्न आहे. दंगलीत आग लागल्यानंतर गोळीबार व लाठीमार करायचा. त्यापेक्षा अगोदरपासूनच सातत्याने प्रयत्न पोलिसांनी केले आणि बाहेरच्या शक्तीने कितीही पेटवलं तरी दंगल होऊ शकत नाही. स्फोटके आधीच ओली केली तर कितीही पेटवले तरी पेटतच नाहीत, त्याकरिता पोलिसांचा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहावा आणि त्या पद्धतीने हा भिवंडी प्रयोग राहील, असे सुरेश खोपडे म्हणाले.
रामलाल, अब्दुल्ला एकाच व्यासपीठावर
भिवंडी शहरात जवळपास ७० मोहल्ला कमिटी तयार करण्यात आल्या. सर्वच समाजाच्या लोकांना यात प्रतिनिधित्व देण्यात आले. प्रत्येकी पाच महिलांचा समावेश असलेल्या शिपायांच्या हाताखाली त्या समित्यांचे कामकाज सुरू करण्यात आले. दर १५ दिवसांनी त्याच परिसरात बैठक घेत हिंदू-मुस्लीम दोघेही एकाच व्यासपीठावर येऊ लागले. सर्व आपसी भाईचारा वाढला. पोलीस मोहल्ल्यात जाऊ लागल्याने अनेक गुन्ह्यांचा निपटारा या ठिकाणी होऊ लागला.
यशोमती ठाकूर, बच्चू कडूंनी प्रयोग करावा
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू दोघांनी हा प्रयोग राबवावा. आपल्याला बच्चू कडू यांनी निमंत्रण दिले आहे. कशा पद्धतीने अचलपुरात हा प्रयोग करता येईल, त्यासाठी आराखडा तयार करून जिल्ह्याच्या रचनेनुसार अचलपूर, अमरावती येथील हा प्रयोग यशस्वी करता येईल. सातत्याने त्यामध्ये लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे व एक चांगले मॉडेल त्यातून देता येईल, असेही सुरेश खोपडे सांगितले.
काय आहे भिवंडी प्रयोग?
१९८४ मध्ये भिवंडी येथे झालेल्या जातीय दंगलीत दोनशेपेक्षा अधिक नागरिकांचा नाहक जीव गेला होता. या काळात राज्यातील जातीय दंगली, कामगार, शेतकरी प्रश्नांचा आयपीएस सुरेश खोपडे यांनी अभ्यास केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाणी बघून आग लागण्याची जशी वाट बघतात. तशाच प्रकारची पद्धत त्यांची आहे. मात्र, आग लागूच नये, याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे आहे. कागदपत्रांची खानापूर्ती होऊ नये, असा भिवंडी प्रयोग आहे.