भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे...!
By Admin | Published: June 29, 2014 11:40 PM2014-06-29T23:40:42+5:302014-06-29T23:40:42+5:30
रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला.
वारकऱ्यांचे माऊलीला साकडे : पावसाची दडी, शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात
अमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदा पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात अन् वारी करून आल्यावर पीक हे चांगलंच वर आलेलं असतं. तेव्हा डवरणी, निंदण आदी सोपस्कार आटोपतात. परंतु यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी निघाले आहे.
नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे।
भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।
या काव्यात टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करीत शेतकरी, वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत. माऊलीची दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी पावसासाठी आर्जव करू लागला आहे. २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.
अमरावती जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी ७०,२०,२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३,७३,००० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. कपाशीसाठी १,५९,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.
जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर कपाशी व सोयाबीनची पेरणी होणार आहे. तसे पाहता विदर्भातील खरिपाची पेरणी २० ते २५ जून दरम्यान दरवर्षी संपुष्टात येते अन् शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो.
यंदा मात्र चित्र उलट आहे. जिल्ह्यात केवळ ४० मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.