पराकोटीच्या दारिद्र्यात जगतोय भोई समाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:46 IST2024-05-13T13:45:48+5:302024-05-13T13:46:24+5:30
एससी, एसटीच्या सवलती मिळणार कधी? नदीपात्रातच जाते आयुष्य

Bhoi samaj is living in extreme poverty
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : गरीब, सालस व प्रामाणिकपणे मासे पकडण्याचे काम करणारा भोई समाज पराकोटीच्या दारिद्र्यात जगत आहे. नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी संपूर्ण आयुष्य जात असताना उद्याच्या पिढीला अनूसुचित जाती-जमातीच्या सवलती मिळणार कधी, असा प्रश्न या समाजबांधवांनी उपस्थित केला आहे.
बारा बलुतेदारांनंतर अठरा अलुतेदारातील महत्त्वाचा घटक म्हणजे भोई समाज आहे. या समाजाला इतिहास मोठा आहे. पूर्वीच्या काळी मंदिर, राजवाड्यांमध्ये पालखी वाहण्याचा मान भोई समाजाला होता. आजही अनेक राज्यात मंदिरातील पालखी भोई समाजबांधवांचा हात लागल्याशिवाय पुढे जात नाही. वेदकाळ, रामायण, महाभारतातील काळ, मध्ययुगीन काळ, शिवकाळाप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकपयोगी समाज म्हणून यांच्याकडे पाहिले गेले. भोई जमात सांस्कृतिकदृष्ट्या आदिवासी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यांना ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश राज्यात अनुसूचित जमातीच्या सवलती मिळतात, तर महाराष्ट्रात नोकरी, शिक्षण क्षेत्रात टिकाव न लागणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीच्या सवलती दिल्या जातात.
१९४७ नंतर भटक्या विमुक्त जमातीच्या सवलती भोई समाजाला मिळाल्या हे जेवढे सत्य आहे, तेवढेच या सवलतीचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत झिरपला नाही, ही बाबसुद्धा तेवढीच सत्य आहे.
जाळे विणण्याचे कामही बंद
भोई समाजातील व्यक्ती पूर्वी कापसापासून सूत करून त्यापासून मासळीचे जाळे विणण्याचे काम करीत असत. जाळ्यामाधून पकडलेले मासे ताजे राहावे, यासाठी बांबूपासून तयार केलेली घुटी पाठीवर ठेवून त्यात मासे ठेवले जात होते. कालांतराने नायलॉनचे रेडीमेड जाळे उपलब्ध झाल्याने जाळे विणण्याचे कामही बंद पडले आहे. तथापि, या जाळ्यांचा भाव अधिक असल्याने अनेकांना व्याजाने पैसे घ्यावे लागतात.
पारंपरिक व्यवसाय संकटात
भोई समाजाचा मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय आता संकटात आला आहे. कमी पर्जन्यमानामुळे नदी-नाले, तलावाच्या पाण्याची पातळी पूर्णतः घटली आहे. अनेक तलाव कोरडे पडले आहेत.
बेरोजगारांची वाढली संख्या
भोई समाजबांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. बेरोजगारांची संख्याही जास्त आहे त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी मत्स्यव्यवसाय संस्थेची निर्मिती करण्यात आली परंतु, तलाव कोरडे होत असल्याने त्या कुचकामी ठरल्या आहेत. एकीकडे माशाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे, दुसरीकडे या व्यवसायात कंत्राटदार मोठ्या प्रमाणात शिरल्याने या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.
शासनाने समाजाला मोफत जाळे द्यावे. अनुदानात वाढ करावी. नवीन वर्षांसाठी मत्स्यबीज अनुदान तत्त्वावर मिळावे. घरकुल योजनेचा लाभ मिळावा. बीपीएलच्या यादीत समावेश व्हावा आदी मागण्या समाजाच्या शासनदरबारी धूळखात
पडल्या आहेत. किसन सूर्यवंशी, विदर्भ मुख्य संघटक, भोई समाज,