भोंदू पवन महाराजने खरेदी केला लाखोंचा फ्लॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:54 PM2018-06-18T23:54:20+5:302018-06-18T23:54:40+5:30
शासकीय वसाहतीतील मोफतच्या घरात राहून भोंदूबाबा पवन महाराजने लाखोंची माया जमवली कशी? सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणारा लाखो रुपयांचा फ्लॅट पवन महाराजने बुक केल्याचे दस्तऐवज पोलिसांना त्याच्या घरातील आलमारीत आढळून आले. त्यामुळे पवन महाराजने अंधश्रद्धाळू श्रीमंतांकडून मिळालेल्या पैशातून लाखोंची माया गोळा केल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय वसाहतीतील मोफतच्या घरात राहून भोंदूबाबा पवन महाराजने लाखोंची माया जमवली कशी? सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणारा लाखो रुपयांचा फ्लॅट पवन महाराजने बुक केल्याचे दस्तऐवज पोलिसांना त्याच्या घरातील आलमारीत आढळून आले. त्यामुळे पवन महाराजने अंधश्रद्धाळू श्रीमंतांकडून मिळालेल्या पैशातून लाखोंची माया गोळा केल्याचे दिसून येत आहे.
गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजच्या घरातील आलमारी उघडली असता, त्यात 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५'चे पुस्तक आढळले. त्यामुळे यावरून पवन महाराज भोळाबाबड्या भक्तांमध्ये अंधश्रद्धा पसरवून पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांना आलमारीत महागड्या साड्या व रहाटगाव परिसरात फ्लॅट बुकिंगचे दस्तऐवज आढळले. त्या सदनिकेची किंमत पवनच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून ४० लाखांच्या घरात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय वसाहतीत पवन महाराज बेकायदेशीर राहात आहे. सर्वसामान्याप्रमाणे पवनची आर्थिक परिस्थिती आहे. मात्र, भोंदूगिरी सुरू केल्यापासून पवनचे संबंध नतमस्तक होणाºया लब्धप्रतिष्ठितांशी जुळल्याने त्याचे दिवसही पालटले.
महागड्या पूजा स्वस्त दरात
धार्मिकतेच्याआड पवन महाराज तंत्रमंत्र विद्येतून नागरिकांची दिशाभूल करीत आहे. भक्तगण पूजा-अर्चा पवन महाराजाच्या हाताने करायचे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन अनेक भाविक विधीवत पूजेसाठी लाखो रुपये खर्च करतात. तीच पूजा पवन महाराज १५ ते २० हजारांत करून द्यायचा. त्या भक्तासोबत त्र्यंबकेश्वरला जाऊन विधिवत पूजा करीत होता.
पवन बीएससीचा विद्यार्थी
पवन घोंगडे हा रविनगर चौकातील एका नामांकित महाविद्यालयात बी.एससी भाग १ मध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिक्षण व लिखाणात अत्यंत हुशार असणाºया पवन महाराजाने धार्मिक विधिवत पूजा-अर्चा करण्याचे ज्ञान अवगत केले. तंज्ञसिद्धी रहस्य पुस्तकाच्या अभ्यासातून तंत्रमंत्र शिकला. भोंदूगिरी करीत तो या व्यवसायात उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पवन महाराजाच्या आलमारीत रहाटगाव परिसरात फ्लॅट बुक केल्याचे दस्तऐवज आढळले. मात्र, त्याच्या गुन्ह्याशी याचा संबंध येत नाही. तो नेमका कुठे आहे, याची माहिती घेत आहे.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर