'त्या' भोंदूबाबाची अंनिससमोर शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:00 AM2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:18+5:30
स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दिले. यापुढे आढळलास, तर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा देण्याचे अर्थात समितीही विसरली नाही.
मोहाच्या झाडाला बनविले होते देव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दिले. यापुढे आढळलास, तर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा देण्याचे अर्थात समितीही विसरली नाही.
स्वप्नात देव आले. मोहाच्या झाडाखाली अस्तित्व असल्याचा दृष्टांत दिला. झाडाजवळ गेल्यावर त्या शक्तीचा भसा झाला, असा बनाव एका व्यक्तीने केला. २५ दिवसांत त्या स्थळावर जत्रा भरायला लागली. हार, फुले, प्रसाद अशी दुकाने थाटली गेली. ‘लोकमत’ने हा अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आणला. लावून धरला. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. रवींद्र उईके नावाचा रोजंदारी मजूर ही ‘बाबागिरी’ करीत असल्याचे त्यांना आढळले. मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील पानझिरी येथे असे स्थान असून, तेथून त्याने ही प्रेरणा घेतली. २ फेब्रुवारीला स्वप्नाचा बनाव केला. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर, पार्वती, नागदेवतेच्या मूर्तींची ओटा बांधून स्थापना केली. अंगात कैलास आणण्याचा दावा केला. कॅन्सर, पक्षाघात, आसध्य रोग, लुळे-पांगळे दुरुस्त करण्याचा दावा केला.
अंनिससमोर देवाशी संपर्काचा प्रयत्न फोल
अंनिसच्या चमूसमोरही त्याने अशा रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मला इथले पाणी चालत नाही, चौऱ्यागडच्या महादेवाचे पाणी बोलावून मी पितो, असा त्याचा दावा होता. अंनिसने त्याची उलटतपासणी सुरू केली. कैलाससोबत थेट संवाद साधून लोकांचे आजार बरे करण्याचाही त्याने दावा केला. अंनिसने त्याला आव्हान दिले. देवाशी तुझा संवाद आहे, लोकांचे रोग ओळखता; आमच्या कार्यकर्त्याच्या खिशात एक चलनी नोट आहे, ती किती रुपयांची आहे आणि त्यावरील क्रमांक काय, हे तू ओळखून दाखव, असे ते आव्हान होते. जवळपास ४५ मिनिटे त्याने देवासोबत संवाद साधला.