गोवंश वाहतुकीचे मेळघाटमार्गे भोपाळ-हैदराबाद कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:04 PM2019-02-27T23:04:31+5:302019-02-27T23:05:05+5:30

मध्यप्रदेशातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक मेळघाटच्या जंगलातून परतवाडा मार्गे होत असल्याचे पंधरवड्यात दुसऱ्यांदा उघडकीस आले. याशिवाय रस्त्याने लागणारे सर्व तपासणी नाके तसेच वझ्झर येथील आरटीओ चेकपोस्टवर कुठलीच तपासणी होत नसल्याचे बुधवारी पोलिसांनी पकडलेल्या गोवंश तस्करीतून स्पष्ट झाले.

Bhopal-Hyderabad connection via Melghat from Govansh Transport | गोवंश वाहतुकीचे मेळघाटमार्गे भोपाळ-हैदराबाद कनेक्शन

गोवंश वाहतुकीचे मेळघाटमार्गे भोपाळ-हैदराबाद कनेक्शन

Next
ठळक मुद्दे२७ जनावरांचा ट्रक पकडला : दोन बैल दगावले, दोघांना अटक, २४ लाखांचा ऐवज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मध्यप्रदेशातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक मेळघाटच्या जंगलातून परतवाडा मार्गे होत असल्याचे पंधरवड्यात दुसऱ्यांदा उघडकीस आले. याशिवाय रस्त्याने लागणारे सर्व तपासणी नाके तसेच वझ्झर येथील आरटीओ चेकपोस्टवर कुठलीच तपासणी होत नसल्याचे बुधवारी पोलिसांनी पकडलेल्या गोवंश तस्करीतून स्पष्ट झाले.
परतवाडा-अमरावती मार्गावरील दर्यापूर फाट्यानजीक बुधवारी पहाटे ४ वाजता वाहनांची तपासणी करताना जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेने २७ गोवंश भरलेला ट्रक पकडला. त्यापैकी दोन बैलांचा मृत्यू झाला. एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
जिल्हा गुन्हे शाखेच्यावतीने नाकाबंदीदरम्यान परतवाडा-अमरावती मार्गावरील दर्यापूर फाट्यानजीक वाहनांची तपासणी सुरू असताना बुधवारी पहाटे ४ वाजता एमएच २० एटी ९८८२ क्रमांकाच्या ट्रकचालकास वाहनाची कागदपत्रे मागितली असता त्याने असमर्थता दाखविली. संशयावरून अधिकाऱ्यांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात गोवंश भरून नेत असल्याचे आढळून आले. ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे गोवंश व २० लाखांचा ट्रक असा २४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पळून जाताना दोघांना अटक
ट्रकमालक भगवानदास गोपालदास बैरागी (५०, रा. लंगापुरा, आष्टा) व आबिदखाँ रफीकखाँ (३२, रा. चिलपोलिया, मध्यप्रदेश) यांंना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दिलीप झळके व अपर पोलीस अधीक्षक जयंत मिणा यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिंद्र शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे, मुकुंद कवाडे, संतोष मुंदाने, पोलीस कर्मचारी जगदीश ठाकरे, सईद खान, अमोल सानप, शंकर मवासी, प्रदीप रायबोले, पवन घरटे, सतीश शेंडे, आसेगावचे ठाणेदार नंदकिशोर काळे आदींनी केली.
मध्यप्रदेश ते हैदराबाद कनेक्शन
मध्यप्रदेशातून गोवंशांची अवैध वाहतूक हैदराबाद येथे केली जात असल्याचे १५ दिवसांत दुसऱ्यांदा उघडकीस आले. १४ फेब्रुवारी रोजी ७८ गोवंशाचा कंटेनर दर्यापूर फाट्यावर याच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला होता. त्यात २५ बैल मृत आढळले. पुन्हा बुधवारी पहाटे ४ वाजता वाहन तपासणीदरम्यान गोवंशाचा ट्रक पकडला. खंडवा, धारणी, सेमाडोह, घटांग, परतवाडामार्गे ही वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
वनविभागाचे नाके व चेकपोस्ट कशासाठी?
सदर मार्गावर भोकरबर्डी, धारणी, हरिसाल, सेमाडोह, बिहाली वन आणि व्याघ्र प्रकल्पाचे तपासणी नाके आहेत. वझ्झरनजीक १५ दिवसांपूर्वी आरटीओ चेकपोस्ट लावण्यात आला. या संपूर्ण नाक्यांवर कुठल्याच प्रकारची तपासणी होत नसल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले. हे संपूर्ण नाके शोभेची वास्तू ठरत आहेत. रात्रीला या चेकपोस्टची दारे बंद असतात. चिरीमिरी घेऊन ट्रक सोडले जातात. हाच तपासणीचा विषय ठरल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Bhopal-Hyderabad connection via Melghat from Govansh Transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.