भूमकाने शोधून काढली कुपोषण ओळखण्याची अनोखी पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:55 AM2023-03-31T10:55:54+5:302023-03-31T10:56:16+5:30
‘लाल पट्टी पर आ गया तो तुरंत दवाखाना भेज देता’; मेळघाटात टेपपट्टीने मोजतात कुपोषण
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट आणि कुपोषण ही नाती गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. शेकडो एनजीओ, आरोग्य यंत्रणांचा फौजफाटा तरीही कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नाही. बालमृत्यू, मातामृत्यूचे सत्र सुरूच आहे. मेळघाटातील आदिवासी औषधोपचार करण्याऐवजी भूमका (मांत्रिकांची) मदत घेतात. भूमका म्हणतील, तोच निर्णय योग्य असा त्यांचा समज आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने कुपोषित बालकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागाने भूमकाचे सहकार्य घेतले आहे. तर भूमकांनी टेपपट्टीच्या आधारे कुपोषण ओळखण्याची अनोखी पद्धत मेळघाटात चर्चेचा विषय ठरली आहे.
चन्नू भुरा भुसूम (रा. खडीमल) असे टेपपट्टीने कुपोषण मोजणाऱ्या भूमकाचे नाव आहे. तालुक्यातील चुरणी येथे भूमकांचे आरोग्य विभागाच्या वतीने मदतीचे आव्हान वजा प्रशिक्षण झाले. कुठल्याही पद्धतीने रुग्ण दवाखान्यात यावा, यासाठी हा अनोखा प्रयोग राज्यात चर्चेत आला आहे. बालक, गर्भवती माता, रुग्णांचा जीव वाचावा हाच मुख्य उद्देश असला तरी एकीकडे टीका टिप्पणी तर दुसरीकडे स्वागतही केले जात आहे. मेळघाटात आदिवासींवर भूमकाचा पगडा भारी आहे. प्रत्येक काम, उपचारासाठी त्यांच्याकडे जाण्याची प्रथा, रुढी, परंपरा आहे. जंगलातील जडीबुटी, मंतरलेले पाणी, लिंबू पूजा, पाठ, नवस हे त्यांच्या पाचवीला पुजले आहे.
भूमकाने पाठविले चार बालक दवाखान्यात
परतवाडा येथे जीवन विकास संस्थेच्या वतीने गतवर्षी दि. २३ सप्टेंबर रोजी मेळघाटातील भूमकांची कार्यशाळा झाली. चन्नू भुसूम यांनी हजेरी लावली होती. कुपोषित बालक कसे ओळखावे, यावर प्रशिक्षण झाले आणि त्या टेपपट्टीने त्यांनी अनेकांना प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडे आलेली चार बालके तीव्र कुपोषित असल्याने दवाखान्यात पाठविली आणि सुदृढ बालके जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी आहे ती टेपपट्टी
जवळपास एक फुटापर्यंत ही टेपपट्टी आहे. त्यावर लाल, पिवळा, हिरवा रंग असलेले निशाण असते. चिमुकल्या बाळांच्या हाताच्या दंडाला वर्तुळाकार पट्टी लावून हिरवा रंगावर असेल तर सर्वसाधारण श्रेणी, पिवळा रंगावर असेल तर कुपोषित, लाल रंग आला असेल तर तीव्र कुपोषित अशी त्यांची ओळख आहे. लाल रंग आला तर उपचार न करता बालकाला थेट दवाखान्यात पाठविले जाते.