पर्यटननगरीतील विदर्भाचे भूषण गाविलगड आजही लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:37+5:302021-06-27T04:09:37+5:30
फोटो गाविलगड पी २६ अनिल कडू परतवाडा : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अनुमतीनंतरही चिखलदऱ्यातील विदर्भाचे भूषण असलेला गाविलगड किल्ला आजही ...
फोटो गाविलगड पी २६
अनिल कडू
परतवाडा : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अनुमतीनंतरही चिखलदऱ्यातील विदर्भाचे भूषण असलेला गाविलगड किल्ला आजही लॉकडाऊन आहे. हा किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकारकक्षेत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने हा गाविलगड किल्ला पुरातत्त्व विभागाने पर्यटकांकरिता मागील अनेक महिन्यांपासून बंद ठेवला होता.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने १४ जून २०२१ च्या पत्रान्वये १६ जून २०२१ पासून राष्ट्रीय महत्त्वाचे प्राचीन संरक्षित स्मारक, पुरातत्त्वीय स्थळ आणि अवशेष पर्यटनाकरिता खुले केले आहेत. असे असूनही गाविलगड आजही लॉकडाऊन आहे. गाविलगड वगळता चिखलदऱ्यातील सर्वच पॉईंट जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने पर्यटकांकरिता खुले केले आहेत. पण, गाविलगड कुलूपबंद आहे.
गाविलगडाचे दोन भाग पडतात. एक आतील किल्ला, तर दुसरा बाहेरील किल्ला. गाविलगड ताब्यात घेतल्यानंतर भोसल्यांनी किल्ल्याच्या बाहेर दगडी परकोट बांधला. तोच हा बाहेरील किल्ला. पण, इतिहासात अजरामर गाविलगड म्हणजे आतील किल्ला. आतील दगडी किल्ला बहामनी वंशातील नववा राजा अहमदशाह वली याने १४२५ मध्ये बांधला, तर इमादशाहीतील फत्तेउल्ला इमानउलखाँ याने १४८८ मध्ये किल्ल्याची दुरुस्ती व विस्तार केला. गाविलगड १७५२ मध्ये निजामशाहीत आला. १५९८ मध्ये अकबराने हा किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. १७३८ मध्ये रघुजी भोसले यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील गाविलगड स्वतःच्या ताब्यात घेतला. पण, अल्पावधीतच तो परत निजामाच्या ताब्यात गेला. पुढे हा किल्ला मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये निजामाकडून परत मिळविला. १८१४ पर्यंत गाविलगड भोसल्यांच्या ताब्यात होता. १५ डिसेंबर १८०३ ला गाविलगड इंग्रजांनी ताब्यात घेतला. किल्ल्यावरील तोफा आणि तोफांचे अवशेष उत्कृष्ट युद्धनीतीची ओळख करून देण्यास पुरेशा ठरतात.
पहिला जोहार
विदर्भातीलच पहिला जोहार १५ डिसेंबर १८०३ ला गाविलगडावर घडला. गाविलगडचा सरदार बेनीसिंह यास वीरगती प्राप्त होताच १३ राजपूत स्त्रियांनी धगधगत्या चितेत उड्या घेऊन जोहार पत्करला. गाविलगडच्या दिल्ली दरवाजाच्या आत हा जोहार घडला.