साईनगरात बिबट आला हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:36+5:302021-06-20T04:10:36+5:30
अमरावती : साईनगर परिसरात झाडावर बिबट्या चढून बसल्याच्या अफवेने शनिवारी साईनगर ढवळून निघाले होते. दुपारी २ पासून नागरिक शोधाशोध ...
अमरावती : साईनगर परिसरात झाडावर बिबट्या चढून बसल्याच्या अफवेने शनिवारी साईनगर ढवळून निघाले होते. दुपारी २ पासून नागरिक शोधाशोध करीत असताना वनविभागाची रेस्क्यू टीमही पोहोचली. मात्र, तीन तासांच्या परिश्रमाचे फळ ‘खोदा पाहाड निकला चुहा’ या म्हणीप्रमाणे निघाले.
साईनगरातील साईबाबांच्या मंदिरामागील कॉलनीत संजय सबनिस यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या विद्या प्रवीण चापके व अनुष्का चापके यांना घराच्या प्रवेशद्वाराजवळ शेपूट दिसल्याने तो प्राणी बिबट्या असल्याचा त्यांना भास झाला. त्यानंतर हा प्राणी घरासमोरील अशोकाच्या झाडावर चढल्याचे त्यांच्या लक्षात आले तसेच घराबाहेर पगमार्क आढळले. तो बिबट्याच असल्याचे नक्की करून त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळापासून शोध घेण्यास प्रारंभ केला. काही वेळातच बिबट्याची वार्ता हवेसारखी परिसरात पसरली. त्यामुळे जो-तो आपल्या परिसरात शोध घेत होता. दरम्यान, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिमुकल्यांना घरातच थांबयला सांगितले. त्यानंतर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. ४ वाजता वनविभागाची रेस्क्यू टीम तसेच वार संस्थेचे नीलेश कांचनपुरे घटनास्थळी दाखल झाले. अशोकाच्या झाडावर बिबट असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. वनरक्षक अमोल गावनेर, मनोज माहूलकर, वनमजूर आशीष खान वाहन चालक वैभव राऊत वनरक्षक़ दिनेश चोले यांनी खाली जाळे टाकून झाडावर दोराच्या साहाय्याने शोध घेतला. तो मसन्याउद असावा, असा संशयदेखील व्यक्त करण्यात आला. त्यामुळे टीममधील एक कर्मचारी झाडावर चढला. मात्र, त्याला काहीही आढळले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कोट
आम्हाला बिबट्यासारखे शेपूट दिसले. फाटकाबाहेर पगमार्क होते. त्यामुळे बिबट झाडावर चढला असल्याचा संशय होता. घाबरगुंडी उडाल्याने ही माहिती तातडीने पोलीस व वनविभागाला दिली.
विद्या चापके, साईनगर
कोट
प्रथमदर्शनी ते पगमार्क बिबट्याचे नव्हे, श्वानाचे असल्याचे निदर्शनास आले. बिबट्या असता, तर झाडावर काही तरी हालचाल केली असती. झाडावर एक पक्षी होता. त्यामुळे थोडी हालचाल होत होती.
विशज बनसोड, वन्यजीवप्रेमी, अमरावती