नुकसान मोठे, पंचनामे खोटे
By admin | Published: April 17, 2015 11:56 PM2015-04-17T23:56:33+5:302015-04-17T23:56:33+5:30
जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले.
नाचविले कागदी घोडे : सर्वच तालुक्यात १५ हजार हेक्टर बाधित क्षेत्र
अमरावती : जिल्ह्यावर डिसेंबर २०१४ अखेरपासून अवकाळी काळी छाया आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. शासनाने या बाधित क्षेत्राला विशेष बाब म्हणून मदतीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ७ हजार ९८३ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा केवळ २८ फेब्रुवारी व १ मार्च या दिनांकांचा पंचनामा करण्यात आला. प्रत्यक्षात मार्च महिन्यात कित्येकदा अवकाळीने पिकाची हानी केली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ हजारावर हेक्टर श्ोतीपीकाचे नुकसान झाले असताना ८ हजार हेक्टरमध्ये नुकसानीचा शासनाचा संयुक्त अहवाल खोटा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
जिल्ह्यात रबी हंगामाकरीता १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. खरीपाचा हंगाम माघारल्याने रबीचा हंगाम देखील दीड महिने माघारला. कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा ५ टक्के अधिक रबीची पेरणी यावर्षी झाली. यामध्ये सर्वाधिक ९८ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा व ५२ हजार हेक्टर क्षेत्रात गहू अशी पेरणी झाली. डिसेंबर २०१४ अखेरीस पासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र जिल्ह्यात सुरु झाले. जानेवारी महिन्यात ३ वेळा, फेब्रुवारीत २ वेळा मार्च महिन्यात ३ वेळा व एप्रिल महिन्यात सध्याही अवकाळीचा कहर सुरुच आहे. शासनाने केवळ फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानूसार दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च या दोन दिवसात ५० टक्याहून अधिक नुकसान झालेले ६ हजार १२१ हेक्टर १२ आर. क्षेत्र आहे.प्रत्यक्षात बाधीत क्षेत्र १५ हजार हेक्टरवर आहे.
केवळ दोन महिन्यांच्या
नुकसानीसाठी निर्णय
राज्य शासनाने अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित क्षेत्राला विशेष मदत देण्याचा निर्णय घेतला तो केवळ दोन महिन्यांच्या बाधित क्षेत्रासाठी आहे. यामध्ये शासनाने शेतीपिके, फळपिके, बहुवार्षिक पिके या सर्व पिकासाठी दोन हेक्टरची मर्यादा ठरविली आहे.