नुकसान मोठे, पंचनामे खोटे
By admin | Published: March 10, 2016 12:26 AM2016-03-10T00:26:10+5:302016-03-10T00:26:10+5:30
जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते.
अमरावती : जिल्ह्यात २७ फेब्रुवारीपासून वादळी पाऊस व गारपिटीने कहर केला. निसर्गाचे हे थैमान ६ मार्चपर्यंत सुरू होते. यामध्ये किमान २४ हजार ११५ क्षेत्रामधील फळ व शेतीपिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाने आता ३३ टक्क्यांवरील नुकसानग्रस्त पिकेच बाधित असल्याचा निकष ठरविलेला आहे. वास्तविक आपत्तीप्रवण क्षेत्रातील सरसकट पिकांचा बाधित क्षेत्रात समावेश होणे महत्त्वाचे असताना अनेक ठिकाणी तसे झालेले नाही त्यामुळे मदतीपासून अनेक शेतकरी वंचित राहू शकतात.
जिल्ह्यात चार दिवसांत २४ हजारांवर क्षेत्राची हानी झाली. वीज पडून ३ व्यक्ती दगावल्या तर लहान-मोठ्या ६ गुरांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने तत्काळ प्राथमिक सर्वेक्षणाचे निर्देश दिले. मात्र, गावस्तरावरील यंत्रणेने कागदी घोडेच नाचविले. तिवसा तालुक्यातील १० गावांचे नुकसान झाले असताना केवळ दोन गावांमधील ८४ हेक्टर शेतीपिकांच्या नुकसानीचा अहवाल महसूल विभागाने दिला. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनही महसूल यंत्रणा कमी नुकसान दाखवित असल्यामुळे राजकीय पक्षांनी फेरसर्वेक्षण करण्याची मागणीकेली आहे. पारदर्शी व वस्तुनिष्ठ सर्वेक्षणानुसार अंतिम अहवालात नोंद न झाल्यास भरपाईपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.