मोठी बातमी: अमरावतीतून नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार; भाजपकडून उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:13 PM2024-03-27T19:13:10+5:302024-03-27T19:14:53+5:30
Navneet Rana: लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून नवनीत राणा या भाजपसोबत होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.
Amravati Lok Sabha ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून या मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून नवनीत राणा या भाजपसोबत होत्या. या पार्श्वभूमीवर यंदा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. या चर्चेवर अखेर आज शिक्कामोर्तब झालं असून भाजपने राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अमरावतीतून भाजपच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीतील घटकपक्षांसह भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राणा यांना उमेदवारी दिल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला होता. तसंच नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल मुंबईत येत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. या नेत्यांमध्ये प्रवीण पोटे, जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण महल्ले, निवेदिता चौधरी, चेतन पवार, किरण पातुरकर आणि रवींद्र खांडेकर यांचा समावेश होता. मात्र हा विरोध झुगारत भाजप नेतृत्वाने नवनीत राणा यांच्यावर विश्वास दाखवत आज त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
BJP releases its seventh list of candidates for the Lok Sabha elections.
— ANI (@ANI) March 27, 2024
Navneet Rana fielded from Amravati constituency in Maharashtra. pic.twitter.com/rfdLYckZUl
बच्चू कडू काय म्हणाले होते?
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात हल्लाबोल करत बच्चू कडू यांनी म्हटलं होतं की, "मतदारसंघात आमची ताकद असतानाही आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. उलट महायुतीच्या संभाव्य उमेदवाराकडून आमच्याच कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आम्ही या जागेवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक चांगला उमदेवार मिळाला असून ६ एप्रिल रोजी आम्ही या उमेदवाराची घोषणा करू. हा उमेदवार भाजपमधीलच आहे," असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला होता.