मोठी बातमी: नवनीत राणांना 'सुप्रीम' दिलासा; जात प्रमाणपत्राबाबत दिला महत्त्वाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 12:35 PM2024-04-04T12:35:47+5:302024-04-04T12:37:13+5:30
Navneet Rana: सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल देण्यात आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Supreme Court Verdict ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने बदलत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच नवनीत राणा यांची कायदेशीर अडचण दूर झाली आहे.
मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र २०२१ मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निकाल देताना न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितलं की, छाननी समितीने योग्य चौकशी करून आणि संबंधित कागदपत्रांचा विचार करून नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे छाननी समितीच्या निष्कर्षात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलण्याची राणा यांची विनंती मान्य केली आहे.
काय होता मुंबई हायकोर्टाचा निर्णय?
मुंबई हायकोर्टान नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, हायकोर्टातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल करण्यात आला होता.