अमरावती बाजार समितीत 'बिहारी राज'
By admin | Published: November 19, 2015 12:43 AM2015-11-19T00:43:54+5:302015-11-19T00:43:54+5:30
तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत.
नियमांना खो : जिल्हाधिकारी, पालकमंत्री करणार का चौकशी?
अमरावती : तब्बल १४०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या अमरावती बाजार समितीत बिहारी मजूर नियमबाह््यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांवर नियमांचा हातोडा हाणणाऱ्या बाजार समितीच्या बिहारीप्रेमाविरुद्ध एल्गार छेडण्याच्या तयारीत मराठी मजूर आहे. तसा इशाराच त्यांनी दिला आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास वातावरण वेळीच शांत होऊ शकेल.
मराठमोळ्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बाजार समितीत धान्याची मोठी उलाढाल होते. पोत्यात धान्य भरणे, पोती वाहून नेणे, पोती मालमोटारीत भरणे या स्वरुपाच्या कामांसाठी मजुरांची गरज भासते. ही कामे करण्यासाठी ४०० ते ५०० मजुरांना बाजार समितीने परवाने देऊन अधिकृत केले आहे. नियमानुसार, परवाने असलेला मजूरच बाजार समितीच्या आवारात प्रवेश करू शकतो, काम करू शकतो. परवाने नसलेले; पण गरज असलेले मराठी मजूर बाजार समितीत काम करू शकत नाहीत. मराठी मजुरांसाठी नियम असा काटेकोर असताना बाजार समितीच्या आवारात बिहारहून मुद्दामच आणले गेलेले सुमारे सव्वाशे मजूर नियमबाह्यरित्या कार्यरत आहेत. मराठी मजुरांच्या हक्काचा घास हिरावणाऱ्या या परप्रांतिय मजुरांसाठी बाजार समितीने सारेच नियम का गुंडाळून ठेवले, असा सवाल मराठी मजुरांचा आहे.
बिहारी मजुरांना बळ
अमरावती : बाजार समितीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बिहारहून मजुरांना आणले आहे. व्यापाऱ्यांच्या निमंत्रणानुसार टोळीने हे मजूर बाजार समितीच्या आवारात दाखल होतात. मराठी मजूर करतात त्याच मालमोटरी भरण्याच्या कामी त्यांना जुंपले जाते. मराठी मजुरांच्या हक्कावर त्यामुळे गदा आली आहे. हल्ली बाजार समितीत धान्याची आवक अल्न असल्यामुळे मराठी मजुरांच्या हाताला काम नाही. अशा बिकट स्थितीतही बाजार समितीत 'बिहारी राज' असल्यामुळे मराठी मजूर जाम संतापला आहे.
मजूर आम्ही आणलेले नाहीत. आम्ही त्यांना परवानेही दिलेले नाहीत, अशी भूमिका घेऊन बाजार समिती व्यापाऱ्यांकडे अंगुलिनिर्देश करतात. तथापि, बिहारचे मजूर मराठी मजूर करतात तेच काम करीत असतील तर त्यांना आणले कुणी हा मुद्दाच गौण ठरतो. व्यापाऱ्यांनी मजूर आणले हे बाजार समितीला मान्य असेल तर व्यापाऱ्यांना मजूर आणता येतात काय? विनापरवाना मजुरांना बाजार समितीत काम करता येते काय? बिहारी मजुरांना अशी मुभा दिली जात असेल तर मराठी मजुरांनाच नियमांच्या बेड्या का? परवाने कशासाठी, या प्रश्नांचे उत्तर बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी द्यावे, अशी अपेक्षा मराठी मजुरांची आहे.