बैलबंडीला धडकली दुचाकी; पती ठार, पत्नी व मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 03:11 PM2022-08-05T15:11:05+5:302022-08-05T15:11:21+5:30
तेरावीच्या कार्यक्रमाला निघाले होते दाम्पत्य
चांदूर बाजार-बेलोरा : शहरात वास्तव्यास असलेले व शिरजगाव बंड येथील मूळ रहिवासी असलेल्या दुचाकीस्वाराचा शिराळा (ता. अमरावती) येथील गब्दामाय मंदिर परिसरात शेतातून निघालेल्या बैलबंडीला धडकून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेली पत्नी व अडीच वर्षांची मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, उमेश ज्ञानेश्वरराव टाले (३५) असे मृताचे नाव आहे. ते सकाळी ९ च्या सुमारास पत्नी अर्पिता (३०) व मुलगा प्रथमेश (अडीच वर्षे) यांच्यासमवेत गोपाळपूर येथे तेरवीकरिता जात होते. चांदूर बाजार ते बोराळा मार्गे अमरावतीकडे येत असताना शिराळानजीक सकाळी ९.३० वाजता शेतात डवरणी करून रस्त्यावर येणाऱ्या बैलबंडीला त्यांची दुचाकी धडकली. यात गंभीर मार लागल्याने उमेश टाले यांचा जागीच मृत्यू झाला. यादरम्यान उधळलेल्या बैलांमुळे बंडी आवरली नसल्याने ती घटनास्थळाहून गावात आली.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील शेतकरी-मजुरांनी धाव घेऊन जखमी माय-लेकांना सावरले. चांदूर बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद राऊत, विनोद इंगळे, प्रशांत भटकर, मंगेश मस्के दाखल झाले. याच मार्गाने येत असलेले आ. बच्चू कडू यांनीदेखील थांबून ॲम्ब्यूलन्सची व्यवस्था केली.
घटनास्थळ वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने चांदूर बाजार पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले. आता पुढील तपास वलगाव पोलीस करीत आहेत.