बहिणीला भेटण्यापूर्वीच भावावर काळाची झडप; दुचाकी अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 02:17 PM2022-11-11T14:17:38+5:302022-11-11T14:23:35+5:30
हनवतखेडा फाट्यानजीक अपघात
परतवाडा/पथ्रोट (अमरावती) : परतवाडा-अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा फाट्यानजीक बहिणीस घ्यायला निघालेल्या भावाच्या दुचाकीला ट्रकची धडक लागली. दुचाकीचालक अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाला. ही घटना सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडली.
एमएच २७ एक्स २८५६ क्रमांकाचा ट्रक परतवाड्याकडून अंजनगावकडे जात असताना समोरील टायर फुटल्यामुळे
गती अनियंत्रित झाली आणि परतवाड्याकडे येणाऱ्या एमएच २७ सीआर ११६८ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार ठार झाला. रोशन वामनराव पडोळे (३०, रा. शिवणी बु., ता. भातकुली) असे मृताचे नाव आहे. तो पथ्रोट येथे बहिणीकडे येत होता. ट्रकच्या धडकेनंतर तरुण घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत बराच वेळ पडून होता. दरम्यान, सावळी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शासकीय रुग्णवाहिकेकरिता मोबाइल क्रमांक डायल केले. तथापि, रुग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी दाखल न झाल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला.
महामार्गावर अपघातांची मालिका
गेल्या दोन महिन्यांपासून परतवाडा-अंजनगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हा सहावा अपघात असून, प्रत्येक अपघातात जखमी घटनास्थळी दगावला आहे. परतवाडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार चव्हाण करीत आहेत.
कुटुंबात दोन महिन्यात दोन मृत्यू
पथ्रोट येथील तेलंगखडी भागात रोशनच्या बहिणीचे सासर आहे. बडवाईक कुटुंबात सुनेला माहेरी पाठविण्याची तयारी झाली असतानाच अपघाताचे वृत्त धडकले. त्याच्या पश्चात आई, चार बहिणी आहेत. वडिलांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर तोच कर्ता होता.