बाजार समिती निवडणुकीत कोट्यवधींची उलाढाल
By admin | Published: August 30, 2015 12:13 AM2015-08-30T00:13:04+5:302015-08-30T00:15:00+5:30
अचलपूर बाजार समितीची निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी झाली. काही उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती आहे.
सुनील देशपांडे अचलपूर
अचलपूर बाजार समितीची निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत पैशांची उधळपट्टी झाली. काही उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याची माहिती आहे. या निवडणुकीला आचारसंहितेचे बंधन नसल्याने खर्चाचा हिशोब विचारणारे कोणी नसल्याने धनदांडग्या उमेदवारांना ही निवडणूक चांगलीच सोईची झाली होती.
जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची ही बाजार समिती आहे. बाजार समिती ज्याच्या ताब्यात राहील, त्याची ग्रामीण भागातील राजकारणावर पकड असते. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४२ उमेदवार होते. ३६ उमेदवार वेगवेगळ्या गटाचे तर ६ अपक्ष होते. एका गटाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू तर दुसऱ्याचे बबलू देशमुख करत होते.
समितीच्या राजकारणात ही दोन दिग्गजांची राजकीय लाढाई मानली जात होती. आपले वर्चस्व बाजार समितीवर रहावे यासाठी दोन दिग्गजांनी राजकीय शक्ती पणाला लावली होती. निवडणूक लढवत असलेले बहुतांशी उमेदवार आर्थिकदृष्ट्या भरभक्कम होते. त्यांचा आपआपल्या भागातील राजकारणात दबदबा होता. त्यामुळे या निवडणुकीत पैशाची गंगा वाहिल्याची चर्चा जनतेत आहे.
खरे म्हणजे या निवडणुकीची एक वेगळीच पद्धत दिसत होती. आचारसंहिता व खर्चाचे बंधन बाजार समितिच्या निवडणुकीला लागू होत नाही. त्यामुळे धनदांडग्या व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोईची असते. सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकारी कायद्यानुसार होतात. सहकार आयुक्तांच्या निर्देशानुसार निवडणुका घेणे सहकारी संस्थांना बंधनकारक आहे. त्यास निवडणूक आयोगाचे बंधन असते. परंतु बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंचीबध्द असल्याने या निवडणुकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे उमेदवाराला बंधनकारक नव्हते. असे नियम व वातावरण असल्याने साधारण वातावरणात निवडणुका होणे शक्य नसल्याचे सूर्यप्रकाशाएवढे सत्य होते. विशेष म्हणजे सहकारी संस्थापेक्षा बाजार समित्यांचा लेखाजोखा मोठा असतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूका नेत्यांना जास्त आकर्षित करत असतात. त्यामुळे साहजिकच या निवडणूका साधारण वातावरणात पार पडत नाही.
निवडणऊकी आचार संहिता व खर्चाचे बंधन नसल्याने निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांनी पदांचा व पैशाचा पुरेपूर वापर केला. त्यावर आपल्या यशापयशाचे गणित आखले होते. यात कुणाचा पैसा किती खर्च झाला कुणी पैशाचा किती पाऊस पाडला हे ज्या त्या उमेदवारालाच माहिती आहे. एका गटाच्या उमेदवाराने तर वाटप करण्यासाठी आपल्या विश्वासातील खास प्रामाणीक व्यक्तीची निवड केली होती. पण पैसा भल्याभल्यांची नीती भ्रष्ट करते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
निवडणुकीत एकूण २४७३ मतदार होेते. ९५.२५ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियादेखील शांततेत पार पडली. यावरून समितीचा मतदार जागृत असल्याचे दिसून आले. त्याला लोकशाहीत आपल्या मताची किमत चांगलीच ठाऊक आहे. काही उमेदवार मतदाराला भेटण्यासाठी जात असताना वाहनांच्या ताफ्याने जात होते. तो ताफा जात असताना हा पंतप्रधानांच्या की, मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा, असा प्रश्न लोकांना पडला होता. मागील पंधरा दिवसांत तालुक्यात पैशांचा पाऊस पडला, असा भास लोकांमध्ये निर्माण झाला होता. अमरावती कृषी उत्तपन्न बाजार समितीनंतर सर्वात मोठी बाजार समितीम्हणून अचलपूर बाजार समितीकडे पाहिले जाते. या समितीची आर्थिक उलाढालदेखील कोट्यवधींच्या घरात आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीचे प्रयत्न सुरु असले तरी लाखोंची उधळण या निवडणुकीत झाल्याचे बोलले जाते.