चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधीचे पाईप पडून; अचलपूर नगरपालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 11:57 AM2020-12-08T11:57:39+5:302020-12-08T11:58:03+5:30
Amravati News चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो पाईप दहा वर्षांपासून पडून आहेत. अचलपूर नगर परिषदेकडून दुर्लक्षित हे पाईप कल्याण मंडपम् परिसरात ठेवण्यात आले आहेत.
अमरावती: चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी रुपये किमतीचे शेकडो पाईप दहा वर्षांपासून पडून आहेत. अचलपूर नगर परिषदेकडून दुर्लक्षित हे पाईप कल्याण मंडपम् परिसरात ठेवण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७-०८ मध्ये अचलपूर-परतवाडा शहराकरिता चंद्रभागा धरणावरील वाढीव पाणीपुरवठा योजना मान्य केली गेली. ४० कोटींची ही योजना पुढे ७० कोटींवर पोहोचली. या योजनेंतर्गत जिंदल सॉ.लि. कडून २००८-०९ मध्ये मोठ्या प्रमाणात पाईप खरेदी केली गेली. याकरिता अचलपूर नगर परिषदेकडून महाराष्ट्र बँकमार्फत दहा कोटींचे लेटर ऑफ क्रेडिटही प्रदान केले गेले. यादरम्यान नियोजनानुसार न घेता, जादा पाईप खरेदी केले गेले. हे अनावश्यक कोट्यवधीचे पाईप दहा वर्षांनंतर आजही शहरात बघायला मिळत आहेत. यातील काही पाईप कल्याण मंडपम् बाहेर बेवारस स्थितीत पडून आहेत. यातील काही पाईप चोरीला गेल्याचे, काहींनी पळवून नेल्याचे वृत्त आहे.
कोट्यवधीचे शेकडो पाईप १० वर्षांपासून पडून असतानाच चार वर्षांपूर्वी अचलपूर-परतवाडा शहराकरिता अमृत योजना मंजूर केली गेली. यात शहरात नव्याने पाईपचे जाळे अंथरले गेले. नवीन पाईप खरेदी केले गेले. कोट्यवधीचा खर्च अमृत योजनेंतर्गत अचलपूर नगरपालिकेकडून केला गेला. ही अमृतची पाईप लाईनही शहरवासीयांना योग्य पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरली आहे. कामाच्या दर्जावर नागरिकांसह नगरसेवकांचा आक्षेप आहे. जवळपास बारा वर्षांत दोन पाणीपुरवठा योजना आणि चंद्रभागा धरणातील भूपृष्ठावरील खात्रीचा स्रोत उपलब्ध झाला असूनही जुळ्या शहरातील जलसंकटावर नगर परिषदेला मात करता आलेली नाही. आजही ट्यूबवेलच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात ठिकठिकाणी या ट्यूबवेल, बोअरवेल पाणीपुरवठ्याच्या पाईपला जोडल्या आहेत.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील कोलमडलेल्या पाणी वितरण व्यवस्थेचे, ‘अमृत’च्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहा महिन्यांपूर्वी दिले. पण, या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. ही चौकशीच नगर परिषदेने गुंडाळून ठेवली आहे. यादरम्यान दहा वर्षांपासून धूळखात पडलेले कोट्यवधीचे शेकडो पाईप नव्याने चर्चेत आले आहेत.