फळगळीमुळे संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:29+5:302021-08-24T04:16:29+5:30
संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे ...
संशोधकांच्या दुर्लक्षामुळे मोर्शी तालुका संकटात, सर्वेक्षण, उपाययोजना करण्याची मागणी फोटो - मोर्शी २३ पीअजय पाटील
मोर्शी : बदलत्या वातावरणामुळे संत्रा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने मोर्शी तालुक्यातील संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे, असा प्रश्न संत्राउत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण करून संशोधकांनी व कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.
मोर्शी तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, तालुक्यातील संत्राबागांवर अज्ञात रोगाने आक्रमण केले. त्यामुळे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून, शेंडेमर रोगामुळे बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरीही संशोधक व कृषी विभागाकडून संत्राउत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळालेले नाही. संत्राबागांची पाहणीदेखील कुणी केलेली नाही. संत्राउत्पादक शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे निविष्ठा विक्रेते व कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना करावी लागत आहे. यात त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. संत्रागळतीची माहिती शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली असूनसुद्धा आजपर्यंत कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
असे आहे संकट
तालुक्यातील लाखो संत्राझाडावर संत्रा गळती, कोलत्या (शेंडेमर, पायकुज व मूळकुज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. शासनाने प्रथम या रोगावर उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
-----------------
आंबिया बहराला गळतीचा मारा
मोर्शी तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी अधिक आहेत. दापोरी, हिवरखेड, बेलोना, उमरखेड, डोंगर यावली, सालबर्डी, पाळा, भिवकुंडी, मायवाडी, तरोडा, धानोरासह तालुक्यातील परिसरात संत्राउत्पादन घेण्यात येते. यावर्षी प्रथमच संत्रा झाडावरील शेंडे अचानक वाळू लागल्याने हिरव्या फांद्यांसह आंबिया बहराची हिरवी संत्री गळून जमिनीवर पडत आहेत. संत्रा उत्पादक शेतकर्यांची सर्वाधिक मदार आंबिया बहरावर असतांना संत्रा गळतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.