उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात बैलजोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:28+5:30
मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तालुक्यातील पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने संप्तत शेतकऱ्यांना घेऊन सातबारा शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात धरणे दिले. शेतकऱ्यांनी एसडीओंच्या दालनात बैलजोडी आणली होती. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.
यावर्षी प्रचंड पावसाने मातीच्या पांदण रस्त्यांवर गाळ झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेला माल घरी आणता आला नाही. परिणामी त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत सतत पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेतली गेली नाही. याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील, रोहयो, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती या विभागांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कृती समिती पदाधिकाऱ्यांनी केला. या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन समितीने केले. यादरम्यान आंदोलकांनी थेट उदयसिंह राजपूत यांच्या दालनात बैलजोडी आणून संताप व्यक्त केला. आंदोलकांशी तहसीलदार संतोष काकडे यांनी चर्चा केली. यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, राजू लोखंडे, समीर जवंजाळ, राजेश उमेकर, मनीष धुर्वे, सचिन अढाऊ, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, रवींद्र उमेकर, विजय बाकेकर, रवींद्र समरित, प्रभाकर गुल्हाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
प्रशासनाची तारांबळ
सातबारा, शेतकरी पांदण रस्ता कृती समितीने पांदण रस्त्यामुळे शेतकºयांच्या हालअपेष्टा कशा होत आहेत, याचे वास्तव चित्र तहसीलदार काकडे यांच्यासमोर मांडले. यादरम्यान भेटीसाठी शिष्टमंडळ उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जात असताना सोबत बैलजोडी घेऊन थेट दालनात पोहोचले. परिणामी येथे उपस्थित तहसिलदारासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.