टंचाई निधीतून भरणार पाणी योजनांची वीज बिले
By admin | Published: May 31, 2014 11:10 PM2014-05-31T23:10:03+5:302014-05-31T23:10:03+5:30
राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व
अमरावती : राज्यातील टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकारने नवीन उपाययोजना अस्तित्वात आणली आहे. वीज बिलाचा भरणा केल्यामुळे टँकरच्या खर्चात होणारी बचत व कमीत कमी खर्चाच्या उपाययोजना लक्षात घेऊन अशा पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने १५ मे ते १५ जून २0१४ या काळातील वीज देयक टंचाई निधीतून देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. टँकरच्या खर्चात बचत होईल, अशाच ठिकाणी वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याने अधिकार्यांना अशा योजना अभ्यास करून शोधाव्या लागणार आहेत.
ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असेल त्या वाड्या-वस्त्यांवर तत्काळ मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना येत्या ३0 जूनपर्यंत दिले आहेत. तसेच पाणी योजना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा करताना टँकरवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. टँकरवर खर्च होणारा हाच पैसा पाणी योजनांची थकित बिले देण्यात घालवला तर निदान टंचाईच्या काळात तरी या समस्येची तीव्रता कमी होणार आहे. यासाठी टँकरच्या खर्चात खरच बचत होईल असाच टंचाईचा परिसर अधिकार्यांना शोधावा लागणार आहे. याठिकाणी अस्तित्वात असणार्या पाणी योजनांची चालू महिन्याची वीज बिले टंचाई निधीतून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रोहयोंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरींचा केवळ पेयजलासाठीच वापर होत असेल. अशा विहिरींना पाईपलाईन व विद्युत मोटारी बसविण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार आहे.
यासाठी होणारा खर्चही पाणीटंचाई निधीतून भागविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पाणी टंचाईच्या विजदेयका अभावी बंद पडलेल्या योजनांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)