रेल्वे इंजिनमध्ये ‘बायो टॉयलेट’
By admin | Published: February 25, 2017 12:10 AM2017-02-25T00:10:51+5:302017-02-25T00:10:51+5:30
प्रवासी गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजीनमध्ये चालकांसाठी आता जैव शौचालय (बायो टॉयलेट) बसविले जाणार आहे.
चालकांना दिलासा : रेल्वे बोर्डाचा निर्णय
अमरावती : प्रवासी गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजीनमध्ये चालकांसाठी आता जैव शौचालय (बायो टॉयलेट) बसविले जाणार आहे. चालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, रेल्वे बोर्डांने हा निर्णय घेतला आहे.
रेल्वे गाड्या डिझेल आणि वीजेवर चालतात. मात्र रेल्वे इंजीनमध्ये तांत्रिक कारण पुढे शौचालय बसविता येणार नाही, असे गृहीत होते. पण, रेल्वे बोर्डांने या तांत्रिक अडचणींवर मात करुन पहिल्या टप्प्यात डिझेल रेल्वे इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी निसर्गाच्या हाकेला ओ देण्याकरिता चालकांना एक तर चालकांना रेल्वे स्थानकावर किंवा सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर टायलेटचा आधार घ्यावा लागत होता. परंतु नव्या निर्णयानुसार चालकांनी आता गैरसोय होणार नाही. डिझेल इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार आहे. त्यानंतर वीजेवर चालणाऱ्या इंजीनमध्ये बायो टॉयलेटचा प्रयोग राबविला जाणार असल्याचीे माहिती रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्यांनी दिली. कालांतराने डिझेल इंजीन हे वातानुकुलित केले जाणार असून त्यादिशेने रेल्वे बोर्डाने वाटचाल सुरु केली आहे. उशिरा का होईना रेल्वे चालकांना दिलासा मिळणार आहे. हल्ली उन्हाळा प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्यात रेल्वे इंजीनमध्ये क्षणभरही थांबणे कठीण राहते. तथापि रेल्वे इंजीनमध्ये पंख्याची सोय असते. पण, ती पुरेशी नसल्याने उन्हाळ्यात चालकांच्या अंगातून घामाच्या धारा निघाल्याशिवाय राहत नाही. तरिदेखील चालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी नियोजीत वेळेवर पोहचवितात. रेल्वे इंजीनमध्ये वातानुकूलित यंत्रणा असावी, ही मागणी गत काही वर्षांपासून चालकांची आहे. मात्र आता इंजीनमध्ये बायो टॉयलेट, वातानुकुलित यंत्रणा बसविण्यास रेल्वे बोर्डाने सन २०१६ मध्ये मान्यता प्रदान केली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तसे संकेत दिले आहे. रेल्वे इंजीनमध्ये बायो टॉयलेट, वातानुकुलित यंत्रणा हा विषय औत्सुक्याचा ठरत आहे. रेल्वेच्या एका डब्यात चार टॉयलेट असून इंजीनमध्ये एकही टॉयलेट बसविण्यात आले नाही. त्यामुळे चालकांची गैरसोय होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २०११ मध्ये ग्वाल्हेर- बुंदेलखंड- वाराणसी एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदा बॉयो टॉयलेट ही संकल्पना राबवण्यिात आली. त्यानंतर दुरांतो, राजधानी व शताब्दी या प्रतिष्ठित रेल्वे गाड्यांच्या इंजीनमध्ये बायो टॉयलेट ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. मात्र इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविण्यास सुरुवात झाली असून लवकरच डिझेल इंजीनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार आहे.
रेल्वे इंजिनमध्ये बायो टॉयलेट बसविले जाणार ही घोषणा रेल्वे मंत्र्यांनी अगोदरच केली आहे. परंतु या घोषणेला कधी मुहूर्तरुप येणार याची प्रतीक्षा चालकांना आहे. इंजिनमध्ये बॉयो 'टॉयलेट' आवश्यक आहे.
- एस.एस. भटकर,
लोको पायलट, बडनेरा