जिल्ह्यात बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:35 AM2017-12-13T00:35:47+5:302017-12-13T00:36:35+5:30
बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्याला या वर्षासाठी १३ लाख ५९ हजार ९४५ रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्याला या वर्षासाठी १३ लाख ५९ हजार ९४५ रुपये अनुदान मंजूर झाले आहे. जिल्ह्याला १०५ एवढे बायोगॅस संयंत्रांचे उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा उद्दिष्ट निम्म्याने घटले आहे.
राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ही महत्त्वपूर्ण योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. बायोगॅस बांधणे व त्यास शौचालय जोडणे, यासाठी अनुदान दिले जाते. टप्प्याटप्प्याने या अनुदानात वाढ झाली. तथापि, बायोगॅससाठी होणारा खर्च अन् मिळणारे अनुदान यात दुप्पट अंतर आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ही योजना राबविण्यास अधिक प्रतिसाद दिला. अलीकडे कमी अनुदान, वाढती महागाईमुळे योजनेला थंड प्रतिसाद मिळत आहे. अशातच गतवर्षी प्रशासनाने २२० चे उदिष्ट पूर्ण केले .
चालू वर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाने बाजारपेठेतील अवस्था पाहिली त्याअनुषंगाने प्रचार, प्रसारास मिळालेला प्रतिसाद अनुभवला. त्यावरून तालुकानिहाय प्रथम बायोगॅसची मागणी मागविली. गतवर्षीपेक्षाही यंदा १४ तालुक्यांतून बोटावर मोजण्या इतके उद्दिष्ट मिळाल्याची माहिती आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. यासाठी राज्य शासनाने १०५ चे बायोगॅसचे उद्दिष्ट मंजूर झाले. त्यासाठी नुकतेच १३ लाख ५९ हजार ९४५ रूपये अनुदान मंजूर झाले.
असे आहे प्रवर्गनिहाय उद्दिष्ट
जिल्ह्यात आर्थिक वर्षात बायोगॅसचे उद्दिष्टांमध्ये सर्वसाधारण ७८, अनुसूचित जाती १५, अनुसूचित जमाती १२, असे एकूण १०५ बायोगॅस संयंत्राचे जिल्ह्यातील १४ तालुक्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.
बायोगॅस संयंत्रासाठी नऊ हजार व त्यात शौचालय जोडणीसाठी बाराशे रूपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ होऊन २० हजार रुपयांपर्यंत मिळावी, अशी मागणी केली आहे. ती मंजूर झाल्यास प्रतिसाद जास्त मिळेल.
- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी जि. प..