लोकशाहीर अण्णाभाऊंचे जीवनचरित्र अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:48 AM2021-01-28T11:48:45+5:302021-01-28T11:49:14+5:30
Amravati News Amravati University संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट केले जाणार आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी याविषयी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाला शनिवारी माहिती दिली. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने २९ जुलै २०२० रोजी बैठकीद्धारे अमरावती विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर अभ्यासक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र समाविष्ट करण्यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन सादर केले होते. सिनेट सदस्य मनीष गवई यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी पत्रव्यवहार केला. अण्णाभाऊंचे जीवनचरित्र अभ्यासक्रमात समावेश करण्यात आले नाही तर आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा विषय मराठी अभ्यास मंडळाच्या सभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी उशिरा का होईना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊंचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. कुलगुरू चांदेकर यांनी घेतलेल्या भूमिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीने स्वागत केले. त्यांचा सत्कारदेखील केला.
यावेळी समाधान वानखडे, दादासाहेब क्षीरसागर, गजानन वानखडे, महादेवराव खंडारे, मनीष गवई, भूषण बनसोड, सुरेश दहिकर, उत्तमराव भैसने, अरूण वानखडे, राजाभाऊ हातागडे, बी.टी. अंभोरे आदी उपस्थित होते.