१ एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी
By admin | Published: March 31, 2016 12:11 AM2016-03-31T00:11:50+5:302016-03-31T00:11:50+5:30
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरवी कर्मचारी कार्यालयीन वेळेचे पालन न करता मनमानी पध्दतीने वागतात.
जितेंद्र दखने अमरावती
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरवी कर्मचारी कार्यालयीन वेळेचे पालन न करता मनमानी पध्दतीने वागतात. कर्मचाऱ्यांच्या या अनियमिततेवर अंकुश लावण्यासाठी १ एप्रिल २०१६ पासून जि.प.च्या सर्वच विभागांमध्ये बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफीवर कायमचा लगाम लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी बायोमेट्रिक यंत्रणा अंमलात आणण्याकरिता प्रयत्न केले. या यंत्रणेसाठी प्रशासनाने सुमारे ३ लाख रूपयांचा प्रस्ताव तयार केला होता. आता प्रत्यक्षात या कामाला अंतिम स्वरूप प्रशासनाने दिले आहे.
जिल्हा परिषदेतील लेटलतीफ कर्मचाऱ्यांची मनमानी आणि अभ्यागतांचे होणारे हाल याबाबतचा सचित्र वृत्तांत लोकमतने प्रकाशित केला होता. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी कर्मचाऱ्यांनी मनमानी, कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहण्याची सवय बाधक असल्याचा निर्वाळा दिला होता. या अनियमिततेला कायमचा लगाम लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत.
यानुसार जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बॉयोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. आता हे कामअंतिम टप्यात आले आहे. १ एप्रिलपासून झेडपीच्या सर्व विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक मशिनवर हजेरी नोंदविली जाणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना आता वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील १४ विभागांत बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेला आळा बसून येथे जिल्हाभरातून कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या वाट्याला येणारी प्रतीक्षा देखील संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.