बॉयोमेट्रिक मशिन बंद हजेरीपत्रकावर नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:37+5:30
ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह सामान्य प्रशासन व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची व जाण्याची वेळ नोंदविण्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. परंतु ही बॉयोमेट्रिक यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी विविध विभागातील कर्मचारी आपली उपस्थिती हजेरीपत्रकांवर नोंदवित आहेत. त्यामुळे अनियमितता होत असून, ही बंद यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची सवड केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर प्रशासकीय सेवा सुलभ व योग्य वेळेत मिळावी याकरिता शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचणे व कार्यालयीन कामकाम संपल्यानंतर घरी परतण्याची नोंद दैनंदिन केली जात आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बहुतांश विभागात लाखो रुपये खर्चून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु सुरुवातीच्या काही महिन्यांचा अपवाद वगळता पुन्हा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील ही यंत्रणा नादुरूस्त झाली. ती बायोमेट्रिक मशीन काढून दुरूस्तीला पाठविल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही ती यंत्रणा कार्यान्वीत केल्या गेली नाही. परिणामी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील यंत्रणा बंद असल्याने कर्मचारी नियोजित वेळत कार्यालयात येतात की नाही, हे अस्पष्ट असले तरी कर्मचारी हजेरी पत्रकावर येण्या जाण्याच्या नोंदी करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील बंद पडलेली बॉयोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यालयी राहणे बंधनकारक
शासकीय कर्मचाऱ्याना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. झेडपीच्या अखत्यारितील विविध विभागांत कार्यरत बरेच कर्मचारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. त्यामुळे कार्यालयात दांडी मारली असली तरी दुसऱ्या दिवशी हजेरी नोंदवून काम भागवितात. त्यावर उपाययोजना म्हणून बॉयोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. परंतु तीसुद्धा बंद पडलेली आहे.