अज्ञाताने फेकलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल ‘बर्ड फ्लू पॉझिटिव्ह'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:55+5:302021-02-20T04:36:55+5:30

अमरावती : जिल्ह्यातील भानखेड वनक्षेत्रात अज्ञाताने फेकलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल शनिवारी बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. या कोंबड्यांचे नमुने ...

'Bird flu positive' report of dead chickens thrown by unknown | अज्ञाताने फेकलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल ‘बर्ड फ्लू पॉझिटिव्ह'

अज्ञाताने फेकलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल ‘बर्ड फ्लू पॉझिटिव्ह'

Next

अमरावती : जिल्ह्यातील भानखेड वनक्षेत्रात अज्ञाताने फेकलेल्या मृत कोंबड्यांचा अहवाल शनिवारी बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. या कोंबड्यांचे नमुने पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा व भोपाळ येथील हाय सिक्युरिटी पशुरोग निदान प्रयोगशाळेत १३ फेब्रुवारी रोजी तपासणीला पाठविले होते.

भानखेडा येथील वनक्षेत्रात १२ फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीने मृत ५० कोंबड्या आणून टाकल्या होत्या. याचा वनविभागाने पंचनामे करून मृत कोंबड्या खोल खड्ड्यात पुरल्या. पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी त्यांचे दोन नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या टीमने जाऊन परिसराची पाहणी केली. आढळलेल्या मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला तरी या क्षेत्रात एकही फार्म नाही. तरीही दक्षता म्हणून फार्म संचालकांना आवश्यक सूचना देत नियमित तपासण्या होत आहेत. घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

भानखेडा शिवाराच्या क्षेत्रात एकही फार्म नाही. तरीदेखील सर्व कुक्कुटपालकांना फार्म व परिसराची जैवसुरक्षा राखली जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पथकांकडून फार्मच्या तपासण्या होत आहेत. विविध फार्मवरील पक्ष्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चिकन-अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत. पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.

-----

१० किमी क्षेत्र ‘इन्फेक्शन झोन’ घोषित

मृत कोंबड्या फेकलेला १० किमीचा परिसर ‘इन्फेक्शन झोन' घोषित करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. रोगांचे सर्वेक्षण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात तीन पथके तयार करण्यात येऊन भानखेड परिसरात सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती डॉ. विजय रहाटे यांनी दिली.

बॉक्स

पुण्याला एच-१ व भोपाळ लॅबमध्ये एन-१ चे निदान

मृत कोंबड्यांच्या दोन नमुने पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, तेथे विषाणूच्या एच-१ चे निदान झाले व भोपाळ येथील लॅबमध्ये विषाणूच्या एन-१ चे निदान झाले. या कोंबड्या ४५ ते ५० दिवसांच्या आहेत व या परिसरात या वयोगटातील कोंबड्या पोल्ट्री फार्ममध्ये नाहीत. त्यामुळे विक्रीच्या अनुषंगाने नेत असणाऱ्या वाहनांनी या कोंबड्या टाकल्या असल्याची शंका व्यक्त होत आहे.

----

कोट

या मृत कोंबड्यांचा अहवाल गुरुवारी रात्री बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे. त्या अनुुषंगाने तीन पथकांद्वारे रोग सर्वेक्षण सुरू केले आहे. या वयोगटातील कोंबड्या या परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये नाहीत.

- विजय रहाटे,

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

Web Title: 'Bird flu positive' report of dead chickens thrown by unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.