पक्ष्यांची पंढरी झाली ‘प्लास्टिकमय’, अधिवास धोक्यात...
By गणेश वासनिक | Published: June 4, 2023 03:51 PM2023-06-04T15:51:46+5:302023-06-04T15:52:56+5:30
प्लास्टिक प्रदूषणावर उपाय शोधण्यात शासन, प्रशासन अपयशी
गणेश वासनिक, अमरावती: महाराष्ट्र ही ‘पक्ष्यांची पंढरी’ म्हणून सर्वपरिचित आहे. विविध प्रकारच्या स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मांदियाळी ईथे पहायला मिळते. पक्षी, पक्षिमित्र व छायाचित्रकारांसाठी राज्यातील तलाव म्हणजे जीव की प्राणच आहे. आजवर अनेक दुर्मिळ पक्ष्यांची नोंद येथे झालेली आहे. मात्र आता ह्या जलीय परिसंस्था प्लास्टिकमय झाल्या आहे. तलावाच्या मागील बाजूला अक्षरशः प्लास्टिक द्रोण, प्लास्टिक पत्रावळीचा मोठा थर साचला आहे. यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
राज्यात विशेषत: एकूण ६४ प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५४१ पक्ष्यांपैकी २८५ प्रकारचे पाणपक्षी व २५६ प्रकारचे रानपक्ष्यांचा समावेश आहे. म्हणजेच एकूण ५४१ पक्ष्यांपैकी २८५ म्हणजेच ५२ टक्के पक्ष्यांचा अधिवास हा जलीय परिसंस्थेशी निगडित आहे. विशेषतः तलावाच्या मागच्या बाजूच्या काठावरील पाणथळ ठिकाणच्या चिखलात अनेक पक्षी आपली गुजराण करतात. पक्ष्यांची तर संपूर्ण जीवनक्रियाच या चिखलाणीवर अवलंबून असते. चिखलाणीमधील कीटक व इतर जीव या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असते. आता या काठावर संपूर्ण प्लास्टिक साचल्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘प्लास्टिक प्रदूषणावर उपाय’ अशी असली तरी प्रशासन ढिम्म असल्याचे वास्तव आहे
०००००००००००००००
स्थानिक व विदेशी पक्ष्यांची पंढरी म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे. साचलेल्या प्लास्टिकमुळे जलीय परिसंस्था प्रदुषित झाली. नागरिकांनी तलाव, नद्या व इतर परिसंस्थामध्ये प्लास्टिक व इतर प्रदूषण होणारे साहित्य टाकू नये. पक्षी अन्नसाखळी मधील महत्वाचा घटक असून मानवाचे अस्तित्व त्यांच्यावर अवलंबून आहे. पक्षी वाचतील तरच मानवप्राणी वाचेल याची जाणीव ठेऊन पक्षी संवर्धन करण्यास मदत करावी.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती