मेळघाटात १३०० ग्रॅम वजनाच्या अर्भकाचा सुखरूप जन्म
By Admin | Published: February 16, 2017 12:10 AM2017-02-16T00:10:54+5:302017-02-16T00:10:54+5:30
मोथा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आलाडोह गावातील ग्रामस्थ कालुजी येवले यांची मुलगी अनिता कृष्ण हेगडे (रा. देवगाव) या गावावरून ...
मोथा उपकेंद्राची कामगिरी : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न फळाला, महिलेची सुखरूप प्रसूती
परतवाडा : मोथा उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आलाडोह गावातील ग्रामस्थ कालुजी येवले यांची मुलगी अनिता कृष्ण हेगडे (रा. देवगाव) या गावावरून आपल्या आई-वडिलांकडे प्रसुतीसाठी आॅक्टोंबर महिन्यात आली होती. तेव्हापासून ही गर्भवती महिला आलाडोह येथे राहत होती. उपकेंद्र मोथा अंतर्गत या गर्भवती महिलेची झिरो नंबरवर नोंद करुन त्या महिलेला आरोग्यसेवा पुरविण्यात आल्या. अशातच २३ डिसेंबर २०१६ रोजी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात तिची प्रसुती झाली. मात्र या महिलेने १ किलो ३०० ग्रॅम वजनाच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला. कमी वजन असल्याने व आईचे दूध ओढू शकत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर त्या बालकाला वाचविण्याची धडपड सुरू झाली. ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी त्या बालकाला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथूनही अमरावतीला रेफर केले. त्यामुळे त्या बाळाला अमरावतीला घेवून जाण्यास घरचे तयार नव्हते म्हणून घरच्यांनी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परतवाडा येथील खासगी बालरोग तज्ज्ञ रावत यांच्याकडे उपचारासाठी नेले. आईचे दूध ओढू शकत नसल्याने बालक दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र डॉक्टरांनी त्या बालकाला नळीद्वारे दूध देण्यास सुरुवात केली. तीन दिवस खासगी रुग्णालयात ठेवल्यानंतर त्या बालकाला नळी लावल्याच्या अवस्थेत घरी नेण्यात आले.
त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या बालकावर विशेष लक्ष ठेवत वेळोवेळी औषधोपचार करून व आईला मार्गदर्शन केले. आज रोजी त्या बालकाची व मातेची प्रकृती व्यवस्थित असून ते बालक आज दीड महिन्याच्यावर झाले असून त्याचे वजन तीन किलो झाले आहे. गुंतागुंतीची प्रसुती व कमी वजनाचे बालक या दोघा मायलेकांना वाचविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, मेळघाटचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रनमले, प्राथमिक आरोग्य केंद्र सलोनाचे वैद्यकिय अधिकारी कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोथा उपकेंद्राच्या वैद्यकिय अधिकारी नीता नागले, सुपरवायझर औतकर, आरोग्यसेवक साळुंखे, आरोग्य सेविका प्रविणा धाकडे, आशा सुपरवायझर शेवंता खडके, अंगणवाडी सेविका सुमित्रा आकोटकर, आशा वर्कर आदींच्या प्रयत्नामुळे त्या बालकाला जिवनदान मिळाले आहे. (तालुका प्रतिनिधी)