जन्म न् कर्मभूमीत ग्रामजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:13 AM2019-05-01T01:13:11+5:302019-05-01T01:14:12+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांचे चिंतन झाले.
तिवसा/ गुरुकुंज (मोझरी) :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांचे चिंतन झाले. त्यानंतर गुरुदेवनगर येथून शोभायात्रा काढण्यात आली. महोत्सवादरम्यान गोपाळकाला कीर्तन झाले. शेतकरी दिलिपराव तिखे, भीमराव वसू, श्रीधर बायस्कर, राजेंद्र घोगरे, धनराज केने,कांचन धनराज बारबुद्धे यांचा शाल-श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय सेनेत कर्तव्यावर असलेल्या असिस्टंट कमांडन्ट चेतन शेलोटकर व श्रीकांत प्रधान यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मातापित्यांचा शाल-श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारणी सदस्य दिलीप कोहळे, भानुदास कराळे, विलासराव साबळे, रायजीप्रभू शेलोटकर आदी उपस्थित होते. संचालन उद्धवराव वानखडे यांनी केले. ग्रामजयंती समितीच्यावतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावली शहीद : सुमधुर संगीत, लखलख पणत्यांचा मंद प्रकाश, घरासमोर काढलेली रांगोळी, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, शंखाचा निनाद अन् हजारो गुरुदेवभक्तांच्या साक्षीने मंगळवारी भल्या पहाटे पाळणा हलला अन् संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मावतरण सोहळा अनुभवण्याचे भाग्य हजारो अनुयायांना लाभले. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता जन्मावतरण पुष्पांजली सोहळ्याला सुरुवात झाली. ग्रामस्थांसह हजारो भक्तांनी या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थिती लावली. तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर या कुटुंबासह जन्मावतरण सोहळ्यात सहभागी झाल्या.
राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद गावात जन्मोत्सव सोहळ्यापूर्वी भल्या पहाटे गावातील गल्ली न गल्ली स्वच्छ करण्यात आली. गल्लीबोळातील अंधार नाहीसा होऊन जणू या गावात आज दिवाळी असल्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत होता. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावरील पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण यावली गाव न्हाऊन निघाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी ग्रामस्थ व गुरुदेवभक्तांना मंत्रमुग्ध केले.
जन्मोत्सवानंतर सामुदायिक ध्यान व आरती झाली. त्यानंतर गावातून पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावलीकरांचे आदरातिथ्य पाहून पालखी व पदयात्रेकरूही भारावून गेले होते. यानिमित्त राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली होती. यावली शहीद ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाºया राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मावतरण सोहळा अमरावती तालुक्यातील यावली शहीद या जन्मभूमीत, तर तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी या कर्मभूमीत ‘ग्रामजयंती’ साजरी झाली. दोन्ही गावांनी दिवाळी अनुभवली. गावा गावाशी जागवा, भेदभाव हा समूह मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे.. या राष्टÑसंतांच्या शिकवणीचा जागर करत हजारो अनुयायी त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.