यावलीत घरोघरी तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:54+5:302021-05-01T04:11:54+5:30
ग्रामजयंती महोत्सव, घरी राहूनच कार्यक्रम तिवसा : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११२ वा ...
ग्रामजयंती महोत्सव, घरी राहूनच कार्यक्रम
तिवसा : अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद येथील जन्मस्थळी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता ब्रम्हमुहूर्तावर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावलीत घरोघरी जन्मोत्सव सोहळा पार पडला. जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमित गावकऱ्यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता केली. यावली हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाली होती. दरम्यान तुकडोजी महाराज यांच्या जन्मभूमीतदेखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावली शहीद येथील तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी पहाटे ४.३० वाजता सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.
एक तास तुकडोजी महाराजांची भजने
तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर ठिक पहाटे ५.३० वाजता तुकडोजी महाराजांचा पाळणा हलला आणि जन्मोत्सव पार पडला. त्यानंतर सामुदायिक ध्यान व महाआरती पार पडली. तीन दिवसांपासून यावली शहीद येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरू होता. दरवर्षी ग्रामजयंतीला या गावात प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास मांडली जाते आणि रांगोळीदेखील काढली जातात. तोच उत्साह यंदा देखील पाहायला मिळाला.