बालिकावधूची प्रसुती; सासरच्या दहा जणांविरुद्ध एफआयआर
By प्रदीप भाकरे | Published: August 13, 2023 02:44 PM2023-08-13T14:44:21+5:302023-08-13T14:44:39+5:30
डफरिनमध्ये झाली होती प्रसुती: कुटुंबाच्या उपस्थितीत लावून दिले गेले लग्न
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुती झाली. २१ जुलै रोजी तिला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ पुरुष व दोन महिला अशा दहा जणांविरुद्ध बलात्कार, पोक्सो तसेच बालविवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. हे प्रकरण अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्यातून चिखलदरा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
तक्रारीनुसार, चिखलदरा तालुक्यातील एकाच गावात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीची गावातीलच एकाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. दरम्यान, मुलगी अल्पवयीन आहे, हे ज्ञात असूनही त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न लावून देण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या तिच्या बालविवाहापूर्वीच ती गर्भवती होती. दरम्यान, त्या अल्पवयीन मुलीला प्रसुतीवेदना सुरू झाल्यामुळे तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून तिला २१ जुलै रोजी अमरावतीच्या डफरीन रुग्णालयात आणले गेले. तेथे त्या अल्पवयीन मुलीची प्रसुती झाली.
प्रसुतीचे वय कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर डफरीन आरोग्य प्रशासनाने त्याबाबत गाडगेनगर पोलिस व बालसंरक्षण कक्षालादेखील माहिती दिली. त्यांच्या समक्ष पोलिसांनी पीडितेसह तिची सासू, गावातील आशा सेविका आदींचे जबाब नोंदविले. त्यावेळी तिचा बालविवाह करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या पतीविरुद्ध बलात्काराचा तसेच पंधराव्या वर्षी लग्न लावून दिल्यामुळे तिच्या माहेरच्या व सासरच्या अशा एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.