पश्चिम विदर्भात ‘गोड साखरेची कडू कहाणी’; ११ साखर कारखाने अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 09:06 PM2021-11-23T21:06:31+5:302021-11-23T21:07:07+5:30
Amravati News दोन ते तीन दशकांत पश्चिम विदर्भात ११ साखर कारखान्यांची निर्मिती करण्यात आली. यापैकी नऊ कारखाने आज विपन्नावस्थेत आहेत.
अमरावती : साखरेच्या उत्पादनात विदर्भात एकूणच नन्नाचा पाढा आहे. एकूण २० साखर कारखान्यांपैकी पश्चिम विदर्भात सहकार तत्त्वावरील ११ साखर कारखाने बंद पडल्याने अवसायनात काढण्यात आले आहे. यातील सात कारखान्यांची खासगी उद्योजकांना विक्री करण्यात आलेली आहे. सध्याची स्थिती पाहता ‘गोड साखरेची कडू कहाणी’ असल्याचे चित्र आहे.
दोन ते तीन दशकांत पश्चिम विदर्भात ११ साखर कारखान्यांची निर्मिती करण्यात आली. यापैकी नऊ कारखाने आज विपन्नावस्थेत आहे. पाच साखर कारखान्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारा खासगी उद्योजकांना विक्री करण्यात आलेली आहे. साखर कारखान्यांसाठी पोषक वातावरण निर्मिती पश्चिम विदर्भात झालेली नसल्याचे वास्तव आहे.
याशिवाय शासनासह व्यवस्थापनाची अनास्था, अनियमितता यामुळेच सहकारातील साखर कारखाने कागदोपत्रीच राहिले. एकमेव सुरू असलेला पुसद येथील वसंत सहकारी साखर कारखाना देखील आर्थिक संकटामुळे चार वर्षांपूर्वी बंद पडला व अवसायनात गेला. त्यामुळे सहकार तत्त्वावरील साखर कारखान्यांची चळवळ आता मोडीत निघाली आहे. सद्यस्थितीत खासगी उद्योजकांनी घेतलेल्या डेक्कन व नॅचरल या दोन कारखान्यांत महिनभरापासून गाळप सुरू झाल्याची माहिती प्रादेशिक संचालक (साखर) विभागाने दिली.
हे साखर कारखाने निघाले अवसायनात
जयकिसान, यवतमाळ (२० ऑक्टोबर २०१६ ला अंतिम असायन आदेश), शेतकरी, धामणगाव (२ मे २००२), श्री अंबादेवी, अमरावती (१० मार्च २००६), कोंडेश्वर, अमरावती (२३ मे २००२), शिवशक्ती, बुलडाणा (२३ डिसेंबर २००५), अकोला जिल्हा, अकोला (१५ जानेवारी २०१३), सुधाकरराव नाईक, यवतमाळ (२५ सप्टेंबर २००६), शंकर, यवतमाळ (२५ सप्टेंबर २००६) जिजामाता, बुलडाणा (२ मे २००२), बालाजी, अकोला-वाशिम (२२ मे २००२), वसंत, पुसद देखील अवसायनात निघालेला आहे.
एकूण कारखाने : ११
अवसायनात निघाले : ११
मराप बँकेच्या ताब्यात : ०५
खासगी उद्योजकांना विक्री : ०७
सध्या खासगीत सुरू कारखाने : ०२
गाळप क्षमता (नॅचरल) : १७, ३५९ मे. टन.
कामकाज बंद असल्याने साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. यापैकी पाच एमएस बँकेने ताब्यात घेतले आहे. जिजामाता (बुलडाणा) व वसंत (पुसद) कारखाना भाड्याने देण्याचे प्रयत्न होत आहे.
-राजेंद्र दाभेराव, विभागीय सहसंचालक (साखर)