भाजपसोबतची कटुता संपली

By admin | Published: April 17, 2016 11:59 PM2016-04-17T23:59:17+5:302016-04-17T23:59:17+5:30

भीमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणानंतर भाजप आणि युवा स्वाभीमान यांच्यामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ....

The bitterness is over with the BJP | भाजपसोबतची कटुता संपली

भाजपसोबतची कटुता संपली

Next

पत्रपरिषद : रवी राणा यांची माहिती; मुख्यमंत्री ३० एप्रिल रोजी भीमटेकडीवर येणार
अमरावती : भीमटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अनावरणानंतर भाजप आणि युवा स्वाभीमान यांच्यामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुमश्चक्रीला अखेर आ. राणांकडूनही पूर्णविराम मिळाला. रविवारी आयोजित पत्रपरिषदेत आ. रवी राणा यांनी आता भाजपसोबतची कटुता संपल्याचे जाहीर केले. याप्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला असून ३० एप्रिल रोजी फडणवीस हे भीमटेकडीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येणार असल्याची माहिती आ. राणा यांनी या पत्रपरिषदेतून दिली.
आ. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याप्रकरणी १५ मिनीट चर्चा झाली असून ते सविस्तर बोलले आहेत. ३० एप्रिल रोजी रेमण्ड फॅक्टरीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री येत आहेत. भीमटेकडीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दलच्या अपूर्ण राहिलेल्या काही तांत्रिक बाबी त्वरेने पूर्ण के ल्या जातील आणि स्वत: बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यानी दिल्याचे, राणांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे भीमटेकडी सौंदर्यीकरण प्रस्तावासाठी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून दिल्याचे आ. राणा यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजपसोबतची कटूता संपली असून भाजपविरोधात कोणतेही आंदोलन न करण्याची भूमिका राणांनी जाहीर केली. विकासकामांसाठी आपण मुख्यमंत्र्यासोबत असल्याचा उच्चार यावेळी राणांनी केला. १४ एप्रिल रोजी महामानवाचा पुतळा झाकून ठेवणे संयुक्तिक नसल्याने पुतळ्याचे अनावरण यथोचित होते. आंबेडकरी अनुयायांच्या मागणीखातर बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचेही राणा म्हणाले.

बाबासाहेब कुण्या जाती-धर्माचे नाहीत
अमरावती : डॉ.बाबासाहेब हे कुण्या जाती-धर्माचे नव्हे, समस्त भारतीयांचे आराध्य आहेत. आता मुख्यमंत्री स्वत: भीमटेकडीवर बाबासाहेबांच्या पुुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येत असल्यामुळे ही बाब मी ‘सकारात्मक’ मानतो. पुतळा अनावरणावरून राजकारण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. राजकारणात शाब्दिक वाद, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच राहतात. त्यामुळे एखाद्याच्या कार्यालयावर हल्ला करणे योग्य असते काय, असा सवाल राणांनी उपस्थित केला. भाजपसोबत आपला कोणताही वैयक्तिक वाद नाही, असे राणांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, नगरसेवक सुनील काळे, बबन रडके, जीतू दुधाने, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना समज दिली
भाजप आणि युवा स्वाभिमान संघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरणानंतर उद्भवलेल्या वादाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना योग्य समज दिली आहे. आता आमचा भाजपसोबत कोणताच वाद नाही. भाजयुमोचे शहाराध्यक्ष विवेक कलोती जखमी झाले आहे. दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेऊ, असेही आ. राणांनी सांगितले.

पालकमंत्र्यांवरील टीका ही वैयक्तिक बाब
भीमटेकडीवर डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा अनावरणप्रसंगी पालकमंत्री पोटे यांच्यावर केलेली टीका ही वैयक्तिक होती. या कार्यक्रमात मी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. पुतळा अनावरणात पालकमंत्र्यांनी अडथळा आणला म्हणून ते व्यक्तव्य केले होते. ते राजकीय पक्षासाठी नव्हते. भाजपसोबत वैयक्तिक वाद नसल्याचे देखील यावेळी आ. राणा म्हणाले. पालकमंत्री हे सगळ्यांचे आहेत. मात्र, ते विकासकामांमध्ये अडथळे आणतात आणि बरेचदा फोन देखील घेत नाहीत, असा आरोपही राणांनी केला.

पालकमंत्र्यांसोबत ‘खुन्नस’ नाही
राजकारणात कधीही द्वेष बाळगायचा नसतो. पालकमंत्र्यांनी पुतळा अनावरणात अडथळे आणले म्हणून त्यांच्याविरोधात मी आरोप केलेत. खोडके दाम्पत्यासोबत राजकीय वाद असला तरी ते माझ्या आई-वडिलांसमान आहेत. तर संजय बंड हे वडिलबंधू आहेत. उद्धव ठाकरेंचा देखील मला फोन येतो. राजकारणात शाब्दिक वाद होतच असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांसोबत खुन्नस नाही, असे प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आ.रवी राणा म्हणाले.

पुतळ्याचा अनादर होऊ नये म्हणूनच केले अनावरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती १४ एप्रिल रोजी देश, विदेशात साजरी केली जात असताना यादिवशी बाबासाहेबांचा भीमटेकडीवरील तो पुतळा झाकून ठेवणे योग्य नव्हते. बौद्ध धम्मप्रचार समितीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्याअनुषंगाने बैठक झाली. महापालिका आयुक्तांनी जागा हस्तांतरित केली. मात्र, अचानक सूत्रे फिरली आणि पुतळा अनावरणामध्ये आडकाठी करण्यात आली. ही बाब योग्य नव्हती. त्यामुळे महामानवाचा अनादर होऊ नये म्हणून १४ एप्रिल या पवित्रदिनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचे आ. राणा म्हणाले.

Web Title: The bitterness is over with the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.