मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर भाजप नगरसेवकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:10+5:302020-12-04T04:33:10+5:30
चांदूर रेल्वेत आंदोलन, विविध मागण्यांचा समावेश चांदूर रेल्वे : शहरातील विविध समस्यांसंदर्भात भाजप नगरसेवकांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कुलूपबंद दालनापुढे ...
चांदूर रेल्वेत आंदोलन, विविध मागण्यांचा समावेश
चांदूर रेल्वे : शहरातील विविध समस्यांसंदर्भात भाजप नगरसेवकांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कुलूपबंद दालनापुढे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. सदर आंदोलनाचे नेतृत्व भाजप नगरसेवक अजय हजारे यांनी केले.
चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या वृक्षारोपणामध्ये नगर परिषदेकडून पैशांचा गैरवापर झाल्याचा भाजपचा आरोप आहे. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. दैनंदिन सफाई कंत्राटी कामगारांची उपस्थिती व वेतनाबाबत माहिती द्यावी. घंटागाडी खरेदी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. प्रभाग क्रमांक ३ मधील नवीन पाईप लाईन अजूनही न टाकल्याबाबत माहिती द्यावी. सन २०१८-१९ मधील घनकचरासंबंधी कामाची देयके प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा काढण्यात येत असल्याच्या तक्रारीवर कारवाईची माहिती देण्यात यावी. दैनंदिन साफसफाईच्या दरवाढीचा ठराव कुठल्या सभेत घेण्यात आला, याबाबतची माहिती देण्यात यावी. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत दुसऱ्या टप्प्यातील अप्राप्त निधीबाबत कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या आंदोलनात समावेश आहे. आंदोलनाची पूर्वसूचना दिल्यानंतरही मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याबाबत नगरसेवक अजय हजारे व सुरेखा तांडेकर संताप व्यक्त करीत दालनाबाहेर ठिय्या दिला.
दरम्यान, आंदोलकांना १ डिसेंबर रोजी बोलावले होते. पण, ते आले नाही. ज्या नगरसेवकाने आंदोलन केले, त्यांना माहिती देण्यात आली. इतर माहिती शुल्क भरून माहिती अधिकारात प्राप्त करून घ्यावी, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी आंदोलनासंदर्भात दिली.