“रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 03:09 PM2021-11-21T15:09:29+5:302021-11-21T15:10:46+5:30
व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजपमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद अमरावतीत उमटले. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अमरावती दौऱ्यावर असून, महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते, रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे, रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आली. देशभरात समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात. हे नियोजित मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले, याची प्रथम चौकशी व्हायला हवी. या पाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का, या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.
आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो
काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते, मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती, तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे, हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटते ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. रझा अकादमीवर बंदी घालायची हिंमत आहे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यशोमती ठाकूर १२ तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत?
यशोमती ठाकूर १२ तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांची मते कमी होणार म्हणून त्या बोलत नाहीत का? राज्यात दंगल भडकणव्यासाठी तयार करण्यासाठीचा कट होता का, त्याची चौकशी व्हावी. १२ तारखेला असाच मोर्चा अमरावतीत निघाला. त्याला परवानगी होती की नाही? होती तर कुणी दिली? ज्यांनी परवानगी दिली त्याने काय विचार करून दिली? त्याची चौकशी झाली पाहिजे. परतीच्या वेळी समाजकंटकांनी दुकाने टार्गेट केली. लोकांना टार्गेट केले. यातून दंगा घडवायचा होता. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या दुकानांना घरांना व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात आले, असा मोठा आरोप फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, अमरावती शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यात अनेक व्यवसायिकांच्या दुकानांची तोडफोड झाली होती. या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता अमरावती शहरातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस अमरावतीत गेले होते. व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.