शेतात भाजपचे झेंडे लावावे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:02 AM2018-05-29T00:02:56+5:302018-05-29T00:03:06+5:30
जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत असल्याने उद्या पाऊस पडल्यास शेतात भाजपचे झेंडे लावायचे का, असा सवाल आ. बच्चू कडू यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना मंगळवारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत असल्याने उद्या पाऊस पडल्यास शेतात भाजपचे झेंडे लावायचे का, असा सवाल आ. बच्चू कडू यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना मंगळवारी केला.
तूर खरेदी केंदे्र तातडीने सुरू करून शेतकऱ्यांची तूर व हरभरा तातडीने खरेदी करा आणि चुकारे तसेच बोंडअळीचा मदतनिधी दिवसभरात द्या, यांसह इतर मागण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील घरासमोर डेरा आंदोलन केले. जोवर मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर येथून हलणार नाही, असे जिल्हा प्रशासनाला ठणकावून सांगितल्याने प्रसासनासह पोलीस विभागाची गोची झाली. दरम्यान, पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आंदोलनस्थळी येऊन उपस्थितांची भेट घेवून मागण्या समजवून घेतल्या तसेच यासंदर्भात राज्याच्या अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
पोलिसांना दिला चकमा
‘पोटे परिवार’ असे खासगी वाहनावर लिहून, सोबत नवरदेवदेखील तयार ठेवून १० ते १२ ट्रॅव्हल्सने आंदोलक पोटे यांचे निवासस्थानी आले. येथेच पोलिसांची फसगत झाली. पालकमंत्र्यांकडचे पाहुणे समजून त्यांना प्रवेश देण्यात आला.
’त्या’ बँक व्यवस्थापकावर गुन्हा
शेतकºयांना मिळालेल्या पीक विमा व बोंड अळीसाठीच्या नुकसान भरपाईमधून बँकांद्वारा कर्जकपात करण्यात येत असल्याचा आरोप आ. कडू यांनी करताच, ‘त्या’ बँकांच्या संबंधित व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
घोषणाबाजीला फाटा
आंदोलनस्थळी शेकडे महिला-पुरुष असताना शासनाच्या निषेधाची एकही घोषना देण्यात आली नाही. याऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने म्हणण्यात आली. यामध्ये आ. बच्चू कडूदेखील सहभागी झाले. शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले.
अडचणीतील शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात येत आहे. तुरीच्या चुकारे व खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लवकरच तूर खरेदी करण्यात येऊन त्वरित चुकारे दिले जातील.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री
गारपीट, पीक विमा व बोंडअळीच्या मदतनिधीतून कर्जकपात करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व बँकांना यापूर्वीच देण्यात आल्यात. असा प्रकार घडला असल्यास त्याची गंभीर दखल घेऊ.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी