भाजपच लढविणार सर्व जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 12:16 AM2017-02-03T00:16:00+5:302017-02-03T00:16:00+5:30
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून केवळ भाजपानेच सर्व जागांवर उमेदवार दिले आहे.
राष्ट्रवादी माघारली : काँग्रेस दोन, तर शिवसेनेने एक जागा सोडली
रवींद्र चांदेकर ल यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून केवळ भाजपानेच सर्व जागांवर उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादीला तब्बल १३ जागांवर उमेदवारच मिळाले नाही.
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्वच पक्षांत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारी वाटपाचा खेळ नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आले.
भाजपाने ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्या काही मातब्बरांना उमेदवारी बहाल केली. परिणामी केवळ भाजपालाच संपूर्ण ५५ जागांवर उमेदवार देता आले. मात्र इतर पक्षांना त्यात यश आले नाही.
शिवसेनेने ५५ पैकी ५४, तर काँग्रेसने ५३ जागांवर उमेदवार दिले आहे. राष्ट्रवादीला मात्र अर्धशतकही गाठता आले नाही. राष्ट्रवादीने ५५ पैकी केवळ ४२ जागांवर उमेदवार दिले. याशिवाय मनसे, बसपानेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मात्र या पक्षांनाही संपूर्ण ५५ जागांवर उमेदवार मिळालेच नाही. त्यामुळे ही निवडणूक काही गटात तिरंगी, काहींत चौरंगी, तर काही गटांमध्ये पंचरंगी होण्याचे संकेत आहे.
काही गटात मातब्बर अपक्षही रिंगणात असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे.
छाननीदरम्यान दोन जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहे. त्यामुळे आता ५५ पैकी काँग्रेसचे उमेदवार केवळ ५१ गटांमध्ये लढणार आहे. विशेष म्हणजे दारव्हा तालुक्यात एका पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तीचाही अर्ज रद्द
झाला आहे.
इच्छुकांचे ऐनवेळी पक्षांतर
आपापल्या पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या काही इच्छुकांनी ऐनवेळी पक्षांतर करून दुसऱ्याच पक्षाची उमेदवारी गळ्यात पाडून घेतली. कळंबमध्ये राष्ट्रवादीच्या एका माजी महिला पदाधिकाऱ्याने काँग्रेसची, तर अन्य एका पदाधिकाऱ्याने भाजपाची उमेदवारी मिळविली. राळेगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अंतिम क्षणी भाजपाने उमेदवारी दिली. वणी तालुक्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने निवडणुकीपूर्वीच भाजपात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळविली.
शिवसेनच्या एकाने वर्षभरापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. पांढरकवडा तालुक्यातही मनसे पदाधिकाऱ्याने भाजपाची उमेदवारी मिळविली. घाटंजी तालुक्यात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याच्या पुत्राला भाजपाने उमेदवारी दिली. दारव्हा तालुक्यातील राष्ट्रवादीचे व उमरखेड तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाच्या गळाला लागले.