भाजप सोडण्याची पोस्ट व्हायरल - प्रवीण पोटेंची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे वृत्त अकोला येथील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरून व्हायरल करण्यात आले आहे. हा मजकूर बदनामीकारक असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी सोमवारी गाडगेनगर ठाणे, सायबर सेल व पोलीस आयुक्तांकडे नोंदविली.
राज्याच्या राजकारणातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या बदनामीकारक मजकुरामागे कोण, याचा शोध आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्यापरीने घेतला. एका भाजप पदाधिकाऱ्यांकडे संशयाची सुई वळत असल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय अस्थैर्याच्या काळात प्रवीण पोटे यांना बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होत आहे. पोलीस तपासात काय तथ्य बाहेर येते, याकडे आता लक्ष केंद्रीत झाले आहे.
‘मी भाजपा सोडतोय’ वॉलवर दिसण्याची भविष्यवाणी
सध्या ‘मी भाजपा सोडतोय’ हा ट्रेंड सोशल मीडियावर सध्या सुपरहीट ठरत आहे. त्यामुळे प्रवीण पोटे यांच्या वॉलवरही हे वाक्य दिसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. पोटे लवकरच काँग्रेसचा ‘हात’ पकडतील, याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी बैठक झाल्याचेही यामध्ये नमूद आहे. फडणवीस मोदींचा कित्ता गिरवित असल्याने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि आता प्रवीण पोटे हे त्यांच्या राजकीय खेळीचे बळी ठरल्याचेही या पोस्टमध्ये नमूद आहे.
कोण हे जयंत गडकरी?
प्रवीण पोटे हे विदर्भातील शिक्षणसम्राट असल्यानेच जयंत गडकरी यांचे विश्वासू सहकारी असल्याचे या मजकुरात नमूद आहे. पोटे हे तिवसा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. त्यांना गडकरींच्या कोट्यातून तिकीट मिळाले. ऐनवेळी फडणवीसांनी गडकरींच्या कोट्यातील तिकिटांना कचºयाची टोपली दाखवीत ‘फडणवीस है तो मुमकीन है’ असं मोदींच्या पावलावर पाऊल टाकत सिद्ध केल्याचा मजकूर या पोस्टमध्ये आहे. त्यामुळे हे जयंत गडकरी कोण, हा विषय चर्चेचा झाला आहे. ही राजकीय बातमी विविध राजकीय पक्षांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर झळकत आहे. त्यामुळे आमदार पोटे यांनी याविषयी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
भाजपा सोडण्याचा प्रश्नच नाही, पोटे यांचा खुलासा
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कार्यरत असताना, अन्य पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी कुठेही अशा प्रकारचे विधान केलेले नाही. काँग्रेसमध्ये जाण्याची बातमी सोशल मीडियावरून प्रसिद्ध करून मला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात माझ्याविषयी असंतोष निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे आमदार प्रवीण पोटे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.