दर्यापूर मतदारसंघात भाजपा, शिवसेनेचे कार्यकर्ते स्वबळाच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 08:47 PM2019-09-17T20:47:15+5:302019-09-17T20:47:30+5:30
मागील आठवड्यात काही इच्छुकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुलाखती दिल्यात.
अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा २३ वर्षे बालेकिल्ला राहिला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने हा गड काबीज केला. या पक्षाचे रमेश बुंदिले हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघातून दुस-यांदा निवडून येण्यासाठी कंबर कसली असून, जनसंपर्कावर भर दिला आहे. इकडे सेना-भाजपाची युती तळ्यात-मळ्यात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. युती न झाल्यास शिवसेना सुद्धा या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार रिंगणात उभा करण्याच्या तयारीत आहे.
मागील आठवड्यात काही इच्छुकांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुलाखती दिल्यात. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या पराभवामुळे पूर्वीच्या तुलनेत दर्यापुरात शिवसेनेची फारशी ताकद राहिली नसली तरी शिवसैनिकांनी मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. शिवसेनेचा हा दावा आमदार रमेश बुंदिले यांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा आहे. सेना-भाजपाची युती झाली आणि मतदारसंघ भाजपला सुटला, तर आमदार बुंदिले यांचा मार्ग सुकर होणार आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीत दुस-या क्रमांकाची मते घेणारे बळवंत वानखडे दोनदा या मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर तिस-यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. मात्र, निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर लढवायची की रिपाइंच्या, हा गुंता अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) आघाडीत दर्यापूरची जागा रिपाइंलाच सोडावी लागणार आणि आमचा उमेदवार बळवंत वानखडे असणार, असे रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी जाहीर करून टाकल्याने काँग्रेसमधील इच्छुक अस्वस्थ झाले आहेत.
सद्यस्थितीत सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तगडा उमेदवाराचा शोध घेणे सुरू केले आहे. प्रत्येक पक्षाकडे इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. पक्षश्रेष्ठींना भेटण्याकरिता त्यांच्या मुंबई वा-या वाढल्या आहेत. भाजपचा उमेदवार बदलविण्यात यावा, अशी एका गटाची मागणी असून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगसेविका सीमा सावळे, गोपाल चंदन, डॉ. राजीव जामठे, चांदूरबाजारचे माजी नगर उपाध्यक्ष विजय विल्हेकर हेसुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत.
शिवसेनेकडून माजी आमदार अभिजीत अडसूळ, ज. मो. अभ्यंकर, अविनाश गायगोले, गजानन लवटे, बबन विल्हेकर, जगदीश विल्हेकर, नंदीनी थोटे, संजय पिंजरकर अशा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसकडूनश्रीराम नेहर यांनी दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीतून साहेबराव वाकपांजर, अंकुश वाकपांजर, संतोष कोल्हे यांच्यासह आणखी सहा जणांनी दावा केला आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांचा मेळावाही नुकताच दर्यापुरात पार पडला. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपासुद्धा उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.