ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:56+5:302021-01-21T04:13:56+5:30
अमरावती : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनेच ५५३ पैकी २०८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबतच ...
अमरावती : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनेच ५५३ पैकी २०८ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबतच भाजपचे २,०६१ सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रवत्ते शिवराय कुलकर्णी यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत केला.
जिल्ह्यातील जनता महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून त्यांनी आपला रोष नुकत्याच पार पडलेल्या ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानातून व्यक्त केल्याचे सांगत काँग्रेसने ३४१ ग्रामपंचायती जिंकल्याचा केलेला दावाही खोटा असल्याचे जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सांगितले. याशिवाय काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतींची यादी जाहीर करावी, असे आव्हान भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. काँग्रेस जर जिंकलेल्या ग्रामपंचायतींची तसेच सदस्यांची ओळखपरेड करून दाखवायला तयार असेल तर भाजपसुध्दा त्याला तयार असून अनेक दिग्जांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यावर केलेला अन्याय ग्रामपंचायत निवडणुकीत भोवल्यचेही चौधरी म्हणाल्या. पत्रपरिषदेला आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, सुमित पवार, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक आदी उपस्थित होते.