‘भाजप विरुद्ध भाजप’
By admin | Published: May 17, 2017 12:11 AM2017-05-17T00:11:14+5:302017-05-17T00:11:14+5:30
दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याच्या ....
आयुक्तांना पत्र : सत्ताधीशांमध्ये स्वच्छता कंत्राटावरून रणकंदन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याच्या प्रस्तावावरून महापालिकेत ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशी लढाई रंगली आहे. स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय हे या कंत्राटाबद्दल प्रचंड आग्रही असताना या ‘वन मॅन क्रॉन्ट्रक्टशिप’ला भाजपच्या बहुतांश नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. सत्ताधीशांमध्ये या कंत्राटावरून लढाई रंगल्याने विरोधी पक्षाचा सूर अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा मुद्दयावर महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे.
स्वच्छतेसाठी एक कंत्राटदार नेमण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आमसभेत येणार असल्याने प्रशासनानेही सावध पवित्रा घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे महापौर संजय नरवणे यांनीसुद्धा हा धोरणात्मक निर्णय असल्याने तो आमसभेत चर्चिला जावा, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधिशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अधोरेखित झाले आहे. स्वच्छता कंत्राटाची प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासह ती पूर्वीच्या पद्धतीने राबविण्यात यावी, असे पत्र स्थायी समितीमध्ये असलेल्या आशिष अतकरे यांच्यासह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी आयुक्तांकडे दिले आहे. विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी यापूर्वीच एक कंत्राटदार नेमण्याच्या प्रस्तावावर आमसभेत चर्चा व्हावी, हा प्रस्ताव आमसभेत चर्चेसाठी ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय ‘वन मॅन क्रॉन्टॅ्रक्टरशिप’साठी आग्रही असताना त्यांच्याच सोबत स्थायीत असलेल्या सदस्यांसह भाजपच्या अन्य सदस्यांनी त्याला पत्राद्वारे विरोध दर्शविल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शहरातील २२ प्रभाागासाठी एकापेक्षा अधिक कंत्राटदार न नेमता एकच बडा कंत्राटदार नेमण्याबाबत महापालिकेने विचार करावा, अशी सूचना आ.सुनील देशमुख यांनी ४ मार्च रोजी महापालिकेत आयोजित बैठकीत केली होती. ती सूचना या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद आहे. महापालिकेत प्रभागनिहाय विविध कंत्राटदाराऐवजी एकच मल्टिनॅशनल कंपनी येणार असल्याचे माहीत होताच कंत्राटदार लॉबी अस्वस्थ झाली. त्यांच्या भावना लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले. दुसरीकडे स्थायी समिती आणि आमसभेकडून हिरवी झेंडी मिळाल्याशिवाय कुठलाच पवित्रा घ्यायचा नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. दरम्यान ११ मे रोजी झालेल्या स्थायी समितीत अमरावती महापालिका अंतर्गत साफसफाईचा कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला भाजपचे बलदेव बजाज सुचक तर चंद्रकांत बोमरे यांनी अनुमोदन दिले.तर याच प्रकारचा प्रस्ताव क्रमांक ४ ने पुन्हा ठेवण्यात आला. त्या प्रस्तावाला माधुरी ठाकरे, मंजुश्री महल्ले, गंगा अंभोरे, बलदेव बजाज, हफिजाबी युसुफ शहा, नजमुन्नीसा सेय्यद मेहमूद , इशरत बानो मन्नान खॉ, शोभा शिंदे आणि सुचिता बिरे यांनी अनुमोदन दिल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमिवर भाजपच्या नगरसेवकांनी दर्शविलेल्या विरोधाला महत्व प्राप्त झाले असून या विरोधाची धार बोथट करण्यासाठी तुषार भारतीय कुठल्या अस्त्राचा वापर करतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आ. सुुनील देशमुख या कंत्राटाबाबत नेमकी कुठली भूमिका घेतात, यावर या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून आहे.
‘वन मॅन क्रॉन्ट्रॅक्टशिप’चा प्रस्ताव प्रशासनाकडे
महापालिका क्षेत्रातील साफसफाईचे कंत्राट एकाच मल्टिनॅशनल कंपनीला देण्यात यावा, अशी ही सभा सर्वोनुमते ठरविते आणि हा प्रस्ताव याच सभेत कायम करून मंजूर करीत असल्याचे पत्र स्थायी समितीकडून प्रशासनाला पाठविण्यात आले आहे. या ठरावाच्या उताऱ्यावर सभापती तुषार भारतीय यांची स्वाक्षरी असून याबाबत त्वरित निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना भारतीय यांनी केली आहे. मात्र प्रशासनाकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आमसभेत पाठविला जाणार असल्याचे संकेत आहेत.