वाईन विक्री विरोधात भाजपचं आंदोलन, भरचौकात थाटले प्रतिकात्मक मद्यविक्रीचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 12:35 PM2022-01-31T12:35:23+5:302022-01-31T13:05:03+5:30
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली.
अमरावती : राज्य सरकारने किराणा दुकानात मद्यविक्री होणार असल्याची घोषणा केली. मात्र, या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे, अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजपाने किराणा दुकानातील दारूविक्री विरोधात आंदोलन करत चक्क भर चौकात प्रतिकात्मक वाईनचं दुकान थाटून मद्यविक्री केंद्र सुरू केलं.
वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली आहे.
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे महाविकास आघाडीसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला, त्यामुळे मद्यविक्री निर्णयाचा विरोध केला जातोय. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात. यावेळी पोलिसांनी भाजप नेते अनिल बोंडेसह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली केवळ स्वत:ची घर भरणं हा एकच उद्देश्य
'शेतकऱ्यांच्या नावाखाली किराणा दुकानांत वाईन विक्री करण्याचा प्रताप या मद्यविक्री आघाडी सरकारने सुरू केला आहे. दोन वर्षातच या सरकारचे खायचे दात दिसायला लागले आहे. दारूबाजांच हित करण्यासाठी या सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज वाईन आणताहेत उद्या आणखी काहीतरी आणतील. शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली केवळ स्वत:ची घर भरणं हा एकच उद्देश्य या वसूली सरकारचा आहे.'
शिवराय कुळकर्णी, भाजप प्रवक्ते