ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:26+5:302021-09-16T04:18:26+5:30
अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असून सरकारच्या विरोधात बुधवारी राजकमल चौकात भाजप ...
अमरावती : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असून सरकारच्या विरोधात बुधवारी राजकमल चौकात भाजप ओबीसी मोर्चा व शहर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. आमदार प्रवीण पोटे, शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
अनेक वर्षांपासून राज्य सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करीत आहे. ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधी दिला नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणाला सहन करावा लागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी कुठलीही हालचाली केली नसल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. राज्य सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असून, ओबीसींना डावलून आता जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेचे निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण नसेल, तर भाजपकडून ओबीसीच्या पूर्वीच्या मतदारसंघात ओबीसी प्रवर्गातील उमेदवार दिले जातील, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.