राणा यांच्या कार्यालयावर भाजपचा हल्ला

By admin | Published: April 16, 2016 12:02 AM2016-04-16T00:02:41+5:302016-04-16T00:02:41+5:30

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबद्दल जाहीर कार्यक्रमातून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ...

BJP's attack on Rana's office | राणा यांच्या कार्यालयावर भाजपचा हल्ला

राणा यांच्या कार्यालयावर भाजपचा हल्ला

Next

पोलीस ठाण्यात आमदारांचा ठिय्या : पालकमंत्र्यांविरुद्धच्या वक्तव्याला हिंसक प्रत्युत्तर
अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याबद्दल जाहीर कार्यक्रमातून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आ. रवि राणा यांच्या राजापेठ परिसरातील जनसंपर्क कार्यालयावर हल्ला केला. खुर्च्यांची फेकाफेकी, दगड-विटांचा मारा करून आ. राणा यांच्या दोन वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. राणा समर्थकांनीही हिंसक प्रत्त्युत्तर दिले. ही धुमश्चक्री तब्बल अर्धातास सुरू होती. आ. राणा स्वत: जनसंपर्क कार्यालयात असतानाच हा प्रकार घडला. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजे १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजतानंतर भीमटेकडीवर नव्याने उभारलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राणा दाम्पत्याने केले. यावेळी केलेल्या भाषणात आ. रवि राणा यांनी पालकमंत्री पोटे यांच्यावर टीका करताना ‘कानाखाली मारेन’, अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ती क्लिप नंतर व्हायरल झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शासकीय यंत्रणेने परवानगी दिली असताना पालकमंत्र्यांनी त्यात खोडा घातल्याचा आरोपही राणांनी केला होता.
जय भीमच्या गर्जना
अमरावती : ‘बाबासाहेबांबद्दल राजकारण करुन आमच्या जखमेवर मीठ चोळाल तर कानाखाली आवाज काढेन’, असा खरमरीत इशारा आ. राणा यांनी भरसभेत पालकमंत्र्यांना दिला होता. या आशयाचे वृत्त शुक्रवारी बहुतांश वृत्तपत्रातून प्रकाशित होताच भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. राणांच्या या कृतीचा निषेध नोंदविण्याकरिता सकाळी १० वाजतापासूनच भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजापेठस्थित भाजप कार्यालयात जमले. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष विवेक कलोती, किरण पातुरकर, अनिल आसलकर, राजू कुरील, लविना हर्षे आदींच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक बैठक घेतली. यामध्ये पालकमंत्री पोटे यांच्याबद्दल आ. राणा यांनी केलेल्या व्यक्तव्यावर मंथन करण्यात आले. त्यानंतर राणांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी राणांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आ. राणा यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले. संतप्त भाजप कार्यकर्ते यावेळी ‘रवी राणा मुर्दाबाद, बाहेर काढा, बाहेर काढा, रवी राणा यांना बाहेर काढा’, अशा घोषणा देत होते. सोबतच ‘पालकमंत्री प्रवीण पोटे जिंदाबाद’चे नारे देत होते. भाजप कार्यकर्त्यांनी राणांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न करताच युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव वाढला. दरम्यान आ. राणांच्या कार्यालयात बंदोबस्तासाठी तैनात दोन-चार पोलिसांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त कार्यकर्त्यांचा आवेश पाहून ते अपुरे पडले.
दोन्ही गटांनी परस्परविरोधी नारेबाजी सुरु केली. त्यातच राणांच्या दिशेने एका भाजप कार्यकर्त्याने बुट भिरकावला आणि त्यानंतर एकमेकांवर विटा, दगडांचा वर्षाव केला. कार्यालयातील राणांच्या पोस्टरला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. काहींनी खुर्च्यांची फेकफाक सुरू केली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्याचा प्रकार सुरु असताना भाजयुमोचे अध्यक्ष विवेक कलोती यांच्या डोक्यावर एक खुर्ची आदळली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. रक्त वाहू लागले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस ताफ्याने काही वेळानंतर भाजप कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. पश्चात पोलीस उपायुक्त नितीन पवार हे राणा यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी आ. राणा प्रसार माध्यमांसमोर या प्रकरणाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यावर आगपाखड करीत असताना कार्यालयाच्या दर्शनी भागेच्या काचेवर एक दगड येऊन आदळला. त्यामुळे काच फुटली आणि पुन्हा गोंधळ उडाला. यानंतर राणांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत. स्वत: आ. राणा यांनी कार्यकर्त्यांना बोलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठले होते. थोड्याच वेळात आ. राणा यांनीदेखील त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाणे गाठून पालकमंत्री पोटे यांच्यासह हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रेटून धरली होती.
युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांवर गुन्हे
शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भाजपचे विलासनगरचे कार्यकर्ते मनीष करेसिया यांच्या तक्रारीवरुन युवा स्वाभिमानचे विनोद गुहे, अविनाश काळे, अनुप अग्रवाल, अभिजीत देशमुख, शुभम उंबरकर व २५ कार्यकर्त्यांविरुध्द कलम १४३, १४७, १४९, ३३६, ५०४ भादंविसह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: BJP's attack on Rana's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.