भाजपाचा पहिला तर कॉंग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर! मतपत्रिका तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 02:29 PM2024-04-10T14:29:39+5:302024-04-10T14:30:09+5:30
Lok Sabha Elections 2024 : सेवा कर्मचाऱ्यांना पाठविल्या : नमुना ७ (अ) ला निवडणूक आयोगाची मान्यता
अमरावती : उमेदवारी अर्जाचा टप्पा आटोपल्यानंतर आता निवडणूक यंत्रणा मतदानाच्या प्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. यामध्ये सर्वप्रथम नमुना मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये उमेदवारांचा मराठी वर्णमालेनुसार क्रम निश्चित करण्यात येऊन आयोगाची मान्यता घेण्यात आली. यामध्ये भाजपाचा उमेदवार पहिल्या, काँग्रेसचा दुसरा व बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अर्जाची माघार झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली व लगेच रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतपत्रिकेसाठी नियमानुसार क्रम निश्चित करण्यात येऊन नमुना ७ (अ) निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला व त्यांच्या मान्यतेनंतर नमुना ७ (अ) प्रसिद्ध करण्यात आला.
मतपत्रिका व ईव्हीएमवर उमेदवारांचा हाच क्रम राहणार आहे. शिवाय मंगळवारी दुपारी ३ पूर्वी या मतपत्रिका अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या २६८९ सेवा दलातील मतदारांच्या अभिलेख कार्यालयात ‘ईटीपीबीएस’ या यंत्रणेद्वारे पाठविण्यात आलेल्या आहेत. लोकसभेसाठी यावेळी ३७ उमेदवार रिंगणात आहेत व आयोगाने मान्यता दिलेल्या क्रमानुसारच या मतपत्रिका टपाली मतदानासाठी व ईव्हीएमवर राहणार आहेत. शिवाय घरून मतदान करणारे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार व दिव्यांग बांधव यांच्या टपाली मतपत्रिकेतही हाच क्रम राहणार आहे.
राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदा, नंतर प्रादेशिक
नमुना ७ (अ) मध्ये सुरुवातीला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तीन उमेदवारांचा समावेश आहे, तर त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे व त्यानंतर २३ अपक्षांची वर्णी लागली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार क्रम तयार करताना मराठी वर्णमालेचा वापर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
असा आहे मतपत्रिकेत क्रम
मतपत्रिकेत राष्ट्रीय पक्ष भाजपाचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर, काँग्रेसचा दुसरा व बीएसपीचा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा क्रम आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), पाचवा रिपब्लिकन सेना, सहावा अ.भा. परिवार पार्टी, सातवा राष्ट्रीय ओलमा पार्टी, आठवा न. भा. एकता पार्टी, नववा प्रहार, दहावा जनहित पार्टी व ११ व्या स्थानी ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार व त्यानंतर २३ अपक्षांचा समावेश आहे.