आमदाराच्या हुकूमशाहीविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:12 PM2017-12-26T23:12:19+5:302017-12-26T23:13:48+5:30
आ. अनिल बोंडे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आहेत. त्यांची वागणूक हुकूमशाहाप्रमाणे आहे.
आॅनलाईन लोकमत
वरूड : आ. अनिल बोंडे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत आहेत. त्यांची वागणूक हुकूमशाहाप्रमाणे आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा व वरूड तालुका भाजप कार्यकारिणीचे आम्ही ३१ पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहोत, अशी माहिती भाजपक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरूड येथे मंगळवारी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
अनपेक्षित घटनाक्रमामुळे वरूड भाजपक्षात राजकीय भूकंप आला असून, याचे हादरे आमदारांना बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांत दोन जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष व भाजप ग्रामीण कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे यांनी सांगितले. तालुक्यामध्ये मागील तीन दशकांपासून भाजप जिवंत ठेवणाऱ्या निष्ठावंतांना आ. बोंडे मागे ठेवत आहेत, तर जनसंग्रामच्या कार्यकर्त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान देत आहेत. भाजपक्षात केवळ कंत्राटदार व जुन्या जनसंग्रमाच्याच कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येत असल्याने कार्यकर्त्यामध्ये असंतोष खदखदत होता. अखेर असंतोषाचा फुगा फुटला. पदाधिकाºयांचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, विदर्भ संघटनमंत्री, जिल्हाध्यक्ष तसेच पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत.
नाराजीचा फुगा फुटला
दरम्यान, २०१५ मध्ये राष्ट्रीय संत्रा परिषदेला मुख्यमंत्री व गडकरींच्या कार्यक्रमापासून निष्ठावंत पदाधिकाºयांना दूर ठेवण्यात आले. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पदाधिकाºयांच्या शिफारस असलेले उमेदवार डावलून नवख्यांना संधी दिली. याचमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला. यंदा झालेल्या राष्ट्रीय संत्रा कृषी विकास परिषदेत संघटनेला बाजूला ठेवण्यात आले. नुकत्याच गव्हाणकूंड येथे झालेल्या सौर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर मंडळ अध्यक्षासह आदी पदाधिकाऱ्यांना कुठेही स्थान देण्यात आले नाही. यापुढे आणखी अपमान सहन करणार नसल्याचे सुतोवाच यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी केले.
यांनी दिला राजीनामा
राजीनामा देणाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव, शहराध्यक्ष नरेंद्र फसाटे, जिल्हा सचिव प्रवीण राठी, अनुसूचित आघाडीचे सुनील गवई, अपंग सेलचे लीलाधर भोंडे, समीर ठाकरे, मगेश खैरकर, शांतीकुमार छांगाणी, सुनील क्षीरसागर, जगदीश बेलसरे, विलास बोहरूपी, विलास घोंगडे, भाजप किसान आघाडीचे महादेव जवादे, दिलीप वानखडे, सुरेंद्र दोड, बलदेव वानखडे, मंगेश लोखंडे, संजय कोहळे, नीलेश गोमकाळे, अशफाक शाह, मनीष शिरभाते, हेमंत कडू, विनोद पाचघरे, वकार खान, अतुल सातपुते, मो. आतीफ अन्वर, गणपत काळे यांच्यासह एकूण ३१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
गव्हाणकुंडमध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांना नेत्यांपर्यंत पोहोचता आले नाही. ही नाराजी पक्षाकडे व्यक्त करायला हवी होती. भाजपमध्ये पत्रपरिषदेतून नाराजी व्यक्त करण्याची पद्धत नाही. माझ्या मंत्रीपदासंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या काही बातम्यांचाही हा परिणाम असू शकतो.
- अनिल बोंडे, आमदार, मोर्शी-वरूड