अमरावतीचे महापौर, उपमहापौरपदी भाजपाची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 08:28 PM2019-11-22T20:28:48+5:302019-11-22T20:30:04+5:30
शहराचे १६ वे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे व उपमहापौरपदी कुसूम साहू विजयी झाल्या आहे.
अमरावती: शहराचे १६ वे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे व उपमहापौरपदी कुसूम साहू विजयी झाल्या आहे. उपमहापौरपदावरून विरोधकांमध्ये मतैक्य न झाल्याने शिवसेना तटस्त राहिल्याने महाशिवआघाडीचा प्रयोग फसला. त्यामुळे काँग्रेसने एमआयएमला सहकार्य केल्याने बसपा एकाकी पडली.
महापालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी शैलेश नवाल व नगरसचिव मदन तांबेकर यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही प्रक्रिया राबविली. महापौरपदासाठी पाच उमेदवार होते. यापैकी काँगे्रसचे विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतल्याने तीन उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये सचिन गावंडे यांना भाजपचे ४५, युवा स्वाभिंमानचे ३ व रिपाइंचे १ असे ४९ मते, एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना काँग्रेस व एमआयएमचे २३, तर बसपाच्या माया देवकर यांना ५ मते मिळाली.
उपमहापौरपदासाठी भाजपच्या कुसूम साहू यांना ४५, बसपाच्या इसरत बानो मन्नान खान यांना ५, एमआयएमचे मो. साबीर मो. नासीर यांना २३ मते मिळाली. या विशेष सभेत एकूण ७७ सदस्य उपस्थित होते. ३ अनुपस्थित, तर ७ सदस्य तटस्त राहिले. चार दिवसांपासून बंडाच्या पावित्र्यात असलेले भाजपचे बंडोबादेखील थंडावल्याने विरोधकांचा गेम प्लॅन हुकला.