रेशनच्या तांदळाला फुटले पाय; ३५२ क्विंटलचा काळाबाजार, एकजण ताब्यात

By प्रदीप भाकरे | Published: October 16, 2023 05:00 PM2023-10-16T17:00:41+5:302023-10-16T17:09:54+5:30

जळगावहून होत होती तस्करी, सीपींच्या विशेष पथकाची कारवाई

Black market of 352 quintals of Ration rice, one arrested; worth 52 lakhs 60 thousand seized | रेशनच्या तांदळाला फुटले पाय; ३५२ क्विंटलचा काळाबाजार, एकजण ताब्यात

रेशनच्या तांदळाला फुटले पाय; ३५२ क्विंटलचा काळाबाजार, एकजण ताब्यात

अमरावती : रेशनचा तांदूळ चिल्लर स्वरूपात खरेदी करून त्याचा काळाबाजार करण्यासाठी होणारी अवैध वाहतूक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने रोखली. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ताब्यात घेण्यात आलेल्या त्या ट्रकमध्ये रेशनचा तब्बल ३५२ क्विंटल तांदूळ आढळून आला. तांदळासह ट्रकदेखील जप्त करण्यात आला. याप्रकरणी, १५ ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वसंत धनगर पाटील (५७,रा. बाळापूर फागणे, धुळे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जळगाव येथून एमएच १८ बीएच ५३४६ या ट्रकमधून शासकीय तांदूळ बडनेरामार्गे पुढे जात असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या सीआययू पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने फ्रेजरपुरा हद्दीतील महामार्गावर तो ट्रक पकडला. ट्रकमधील तांदळाच्या पोत्यांबाबत ट्रकचालक वसंत पाटील याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याच्या उत्तराने सीआययूचे समाधान झाले नाही. त्यामुळे शहानिशा करण्याकरिता पथकाने तांदूळासह ट्रक जप्त केला. प्रथमदर्शनी तो तांदूळ रेशनचा असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार सोमवारी सकाळी पुरवठा विभागासोबत संपर्क करून जप्त तांदूळाबाबत लेखी अहवाल मागविण्या आला.

पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठून तो तांदूळ शासकीय असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ट्रकचालक शासकीय तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १७ लाख ६० हजारांचा ३५२ क्विंटल तांदूळ व ट्रक असा एकूण ५२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रकचालकाविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील व विक्रम साळी, क्राईम एसीपी प्रशांत राजे व फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सीआययू प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, अंमलदार सुनील लासूरकर, विनय मोहोड, जहीर शेख, विनोद काटकर व अन्न पुरवठा अधिकारी निखिल नलावडे यांनी केली.

Web Title: Black market of 352 quintals of Ration rice, one arrested; worth 52 lakhs 60 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.